भुसावळात विवाहितेचा खून करणार्‍या आरोपी पतीची कारागृहात रवानगी

कौटूंबिक कलहातून पत्नीला संपवले : मनमाड स्थानकावर आरोपीला बेड्या


Accused husband who killed wife in Bhusawal sent to jail भुसावळ (31 ऑक्टोबर 2024) : शहरातील द्वारका नगरात 24 वर्षीय विवाहितेचा डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने खून करण्यात आला होता. ही घटना मंगळवार, 29 रोजी समोर आली होती. याप्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना त्यास मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. अक्षय गुंजाळ (26, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

पतीला हिणवल्याने पत्नीचा खून
शहरातील द्वारका नगरात विवाहिता वर्षा गुंजाळ (24) ही व्यवसायाने पेंटर असलेला पती अक्षय गुंजाळ सोबत वास्तव्यास होती मात्र दाम्पत्यात किरकोळ वादातून खटके उडत होते शिवाय पत्नी वर्षा ही पतीला घालून-पाडून बोलत असल्याने मंगळवारी दुपारी दाम्पत्यात वाद उफाळला. आरोपी पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला व पत्नी गंभीर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी पळ काढला.

दरम्यान, विवाहिता अत्यवस्थ अवस्थेत असल्यानंतर नागरिकांनी शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर यंत्रणेने धाव घेत महिलेला ट्रामा सेंटरमध्ये हलवले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. बुधवारी विवाहितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आरोपीला मनमाड रेल्वे स्थानकावर पकडले
विवाहितेवर हल्ला करून पसार झालेला आरोपी अक्षय गुंजाळ हा भुसावळ रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणार्‍या गाडीत बसून मनमाड रेल्वे स्थानकावर उतरला व मंगळवारी रात्री प्लॅटफार्मवरच झोपला. संशयीताच्या मागावर असलेल्या यंत्रणेने त्याचा थांगपत्ता काढत मनमाड रेल्वे सुरक्षा बलाला माहिती दिली व प्लॅटफार्मवरच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या व शहर पोलिसांना माहिती कळवण्यात आल्यानंतर रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. बुधवारी अतिरीक्त सत्र न्यायालयात त्यास हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास शहरचे पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !