दुचाकीस्वारांनो हेल्मेट घाला अन्यथा नववर्षापासून होणार मोठी दंडात्मक कारवाई
राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालकासह पाठीमागे बसणार्याला हेल्मेट सक्ती : पोलीस अधीक्षकांचे आदेश
Bike riders, wear helmets, otherwise there will be major penalties from the New Year जळगाव (31 डिसेंबर 2024) : नववर्षाच्या सुरूवातीपासून अर्थात 1 जानेवारीपासून महामार्गावर दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणार्या वाहनधारकावर तसेच पाठीमागे बसलेल्या दुचाकीस्वारावर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.
दोघांना हेल्मेट बंधनकारक
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण पहाता सन-2024 मध्ये झालेल्या 561 अपघातांमध्ये सुमारे 441 जणांचा मृत्यु झालेल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोटार वाहन कायद्यान्वये दुचाकीस्वाराने हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 129 नुसार तसेच सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार भारतात कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी वाहन चालविणार्या तसेच पाठीमागे बसणार्या व्यक्तिने देखील हेल्मेट परिधान करणे बंधनकारक केले आहे.

महामार्गावर हेल्मेट सक्ती ः निरीक्षक राहुल गायकवाड
हेल्मेट परिधान केल्याने दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्याने वाढते. मोटार वाहन चालवितांना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तरी सर्व नागरिकांनी 1 जानेवारी 2025 पासून वाहन चालवितांना नियमीतपणे हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक आहे. दुचाकी वापरतांना हेल्मेट परिधान केले नसल्यास संबंधीत नागरीक हे मोटार वाहन कायदा 1988 च्या तरतुदीनुसार दंडास पात्र राहतील. पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशान्वये फक्त राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आल्याचे शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक राहुल बी.गायकवाड म्हणाले.









