भुसावळात चोरट्यांची पोलिसांना सलामी ; तीन दुकाने फोडली
चार दुकानांचे कुलूप न तुटल्याने नुकसान टळले
भुसावळ : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरटे शहरात सक्रिय झाले असून मंगळवारी रात्री मामाजी टॉकीज परीरसरातील एकाच ओळीतील सात दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले. तीन दुकानांमध्ये चोरी झाली, तर अन्य चार दुकानांचे कुलूप न तुटल्याने सुदैवाने नुकसान टळले. या चोरीत तीन हजार रुपये आणि लॅपटॉप चोरट्यांनी लांबवला. मामाजी टॉकीज समोरील महेश डेअरीचे कुलूप चोरट्यांनी चाबीने उघडत गल्ल्यातील 50 रुपये लांबवले. याच परिसरातील अन्य चार दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न सुदैवाने अयशस्वी झाला. सईद भंगारवाले यांच्या आणि फिरोज पिंजारी यांच्या इलेक्ट्रीकच्या दुकानाचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. तर नगरसेवक मुकेश पाटील यांच्या कार्यालयाजवळील नरेद्र पाटील यांच्या ओंकार इलेक्ट्रीक या दुकानाचेही कुलूप न तुटल्याने नुकसान टळले. त्यांच्या शेजारील हितेंद्र शहा यांच्या ऑटो मोबाईल दुकानाचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न फसला. याच परिसरातील स्टेशनरीच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप लांबवला. अशोक रोडवेज या दुकानातील कपाट फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली. गवळी वाड्याच्या कॉर्नरला असलेले राजकुमार टेईलानी यांचे अशोक रोडवेज या दुकानातील कपाटातील तीन हजारांची रोकड लांबवण्यात आली.