50 रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल : तीन वाहतूक पोलिसांचे निलंबन


पाचोरा (31 मार्च 2025) :  पाचोरा तालुक्यातील केळी वाहतूक करणार्‍या वाहन चालकाकडून 50 रुपयांची लाच घेताना वाहतूक पोलिसांचा व्हिडिओ सोशल मिडीयात तुफान व्हायरल झाला होता. या प्रकाराने पोलीस दलाची चांगलीच प्रतिमा मलीन होवून सोशल मिडीयावर जोरदार टीका झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रकाराची दखल घेत ट्रक चालकाकडून पैसे घेणार्‍या पाचोरा पोलीस ठाण्यातील पवन पाटील तसेच गुलाबराव मनोरे व चेतन सोनवणे या तिघांना निलंबित करण्यात आल्याने लाचखोर कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत.

व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस दलाची बदनामी
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाचोरा तालुक्यात वाहतूक पोलीस पवन पाटील यांनी केळी वाहतूक करणारे वाहन अडवून चालकाकडे 500 रुपयांची मागणी केली परंतु चालक 50 पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसाने, आमची इतकीच इज्जत आहे का, असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले, असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून आले होते.

पोलिसाला अद्दल घडविण्यासाठी पैसे घेतानाच व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये बनवला. ट्रक चालक आणि पोलीस या दोघांमधील संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात टाकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रकचालकाकडून 50 रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये पाचोरा पोलीस ठाण्यातील पवन पाटील तसेच गुलाबराव मनोरे हेदेखील उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !