बोदवडमधील भोगवटाधारकांच्या न्यायासाठी सेनेचा मोर्चा
नगरपरीषदेत मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षक नसल्याने मोर्चेकर्यांचा तासभर ठिय्या
बोदवड : भोगवटाधारकांना कायम करून भूमिअभिलेखमध्ये त्याची नोंद करण्याच्या मागणीसाठी शहरात गुरुवारी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा नगरपंचायतीवर काढण्यात आला. नगरपरीषदेत मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षक नसल्याने मोर्चेकर्यांनी तासभर ठिय्या मांडला. बेघर लोकांच्या जागेचा सर्व्हेनंतर प्रधानमंत्री आवास योजनेबाबत लाभ देण्याचे मोर्चेकर्यांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विराट मोर्चाने वेधले लक्ष
गुरुवारी सकाळी 11 वाजता म्हसोबा मंदिरापासून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला. शासनाने दिलेले प्लॉट व भोगवटा कायमकरून सिटी सर्व्हेमध्ये नोंद करण्याच्या मागणीसाठी नगरपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला. नगरपंचायत मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी कार्यालयामध्ये हजर नसल्यामुळे मोर्चेकर्यांनी कार्यालयाचा ताबा घेत तासभर ठिय्या आंदोलन केले. तहसीलदार रवींद्र जोगी यांना नगरपंचायत कार्यालयात बोलावण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष मुमताज बी.बागवान व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात तालुकाप्रमुख गजानन खोडके, उपजिल्हा संघटक असलम भाई सुनील पाटील, शांताराम कोळी, गोपाळ पाटील, नईम बागवान, हर्षल बडगुजर, निलेश माळी, शेख कलीम शेख, नाना माळी, राहुल माळी, विकी शर्मा, विमलबाई यासह उषाबाई, लताबाई माळी यासह महिला व नागरीक व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.