यावल शहरात सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला
चार संशयित सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद : परिसरातील एक बंद घर देखील केले लक्ष

Attempt to break into a bullion shop in Yaval city fails यावल (12 मे 2025) : शहरातील मेन रोडवर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले मात्र आतदेखील चैनल गेट असल्याने चोरीचा हा त्यांचा प्रयत्न फसला.
दरम्यान तेथून पुढे याच भागातील एका कुलूप बंद घराला देखील त्यांनी लक्ष केले. घराचे कुलूप तोडले मात्र घरात काहीच नव्हते. तर यापूर्वी याच मेन रोडवर एका दवाखान्यात अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली होती व आता या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या प्रयत्नाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

काय घडले यावल शहरात ?
यावल शहरात मेन रोडवर चावडीच्या पुढे लक्ष्मी ज्वेलर्स नामक नितीन दिनकर रणधीरे यांचे दुकान आहे. या दुकानाचे शटरचे कुलूप रविवारी पहाटेपूर्वी चार वाजेच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात चोरट्याने तोडले. आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी. एल. 9757) असा सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसून आला आहे तर चार जण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. येथे चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा या भागातील कांचन श्रीराम सराफ यांच्या घराकडे वळवला त्यांच्या घराला कुलूप होते.
कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र घरामध्ये चोरी करणे योग्य काहीच नव्हते म्हणून ते तिथून पसार झाले. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार निलेश चौधरी यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.
