रेल्वे प्रवासात चोरट्यांचा धुमाकूळ : तीन प्रवाशांचा 78 हजारांचा ऐवज लंपास

भुसावळ रेल्वे लोहमार्ग ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल


भुसावळ (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना लक्ष्य करणार्‍या चोरट्यांनी पुन्हा एकदा सक्रियता दाखविली आहे. भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही दिवसांत चोरीच्या तीन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. झोपेचा किंवा गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तीन प्रवाशांचे मोबाईल, सोन्याचे दागिने, रोकड, आधारकार्ड व इतर साहित्य असा एकूण 78 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या तिन्ही प्रकरणांमध्ये भुसावळ रेल्वे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

अशी घडल्या घटना
पहिल्या घटनेत मध्य प्रदेशातील प्रशांत लक्ष्मण सोनवणे (वय 31) हे 29 जुलै रोजी वडनेरा-पुणे एक्स्प्रेसने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान ते आपल्या आरक्षित जागेवर झोपले होते. सुमारे पाच मिनिटांनी जाग आल्यानंतर त्यांच्या जवळ ठेवलेला मोटोरोला कंपनीचा सुमारे 24 हजार रुपयांचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून न आल्याने 2 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या घटनेत मध्य प्रदेशातील प्रमोद आनंद चतुर्वेदी (व63) हे डॉ. शालिमार एक्स्प्रेसने पुण्याहून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांनी आपली बॅग सीटखाली ठेवली होती. भुसावळ स्थानक परिसरात जाग आल्यानंतर बॅगेतील साहित्याची पाहणी केली असता त्यामधील दोन मोबाईल, दहा हजार रुपयांची रोकड, आधारकार्ड असा एकूण 38 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे उघड झाले. या प्रकरणीही भुसावळ रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तिसरी घटना जळगाव रेल्वे स्थानकातील महिला प्रतीक्षालयात घडली. गुजरातमधील पूजा संजय खानपरा (27) या 2 ऑगस्ट रोजी पहाटे रेल्वेची प्रतीक्षा करत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरील महिला प्रतीक्षालयात झोपल्या होत्या. त्यांच्या शेजारी ठेवलेल्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने सोन्याची साखळी, दोन ग्रॅम वजनाची नथ, आधारकार्ड आणि कपडे असा सुमारे 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. जाग आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !