मुक्ताईनगर तालुका हादरला : पगाराचे पैसे मागितल्याच्या रागातून वॉचमनची हत्या
Muktainagar Taluka Shaken : Watchman Murdered in Retaliation for Demanding Salary मुक्ताईनगर (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : पगाराचे थकीत पैसे मागितल्याच्या वादानंतर हॉटेल मालकाने वॉचमनला गॅरेजमध्ये नेत लाकडी काठीने डोक्यात गंभीर मारहाण केली. उपचारादरम्यान या वॉचमनचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोकूळ तारासिंग जाधव (50, रा.निंभोरा, ता.रावेर, जि.जळगाव) असे मृत वॉचमनचे नाव आहे.

काय आहे नेमकी घटना ?
मुक्ताईनगर-बर्हाणपूर हायवेवरील उचंदा शिवारातील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर गेल्या पाच महिन्यांपासून जाधव हे वॉचमन होते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव (55) या याच हॉटेलमध्ये पोळ्या बनवण्याचे काम करतात. ढाबा मालक कमलजीतसिंग प्रितमसिंग याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पती-पत्नी दोघांचाही पगार दिला नसल्याने शनिवार, 1 ऑगस्ट 2026 रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास गोकूळ जाधव यांनी कमलजीतसिंग यांच्याकडे आपल्या हक्काच्या पगाराचे पैसे मागितले. यावरून संतापलेल्या कमलजीतसिंग याने गोकूळ जाधव यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गॅरेजजवळ नेले आणि तेथे त्यांच्या डोक्यात लाकडी काठीने जोरदार प्रहार केला.
उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
या मारहाणीत गोकूळ जाधव यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त निघू लागले आणि ते तेथेच बेशुद्ध पडले. यानंतर आरोपी हॉटेल मालक हॉटेलमध्ये येऊन बसला तर पती मारहाणीत अत्यवस्थ झाल्याची माहिती कळताच सुमित्राबाई धांनी धाव घेत जाधव यांना तातडीने प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी भुसावळ व तेथून बुरहानपूर येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच रविवार, 2 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी मृत गोकूळ जाधव यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी कमलजीतसिंग प्रितमसिंग याच्याविरोधात विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.