जळगाव एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : अट्टल घरफोड्या करणारे चोरटे जाळ्यात

Jalgaon MIDC Police’s big achievement : Persistent burglars caught in the net जळगाव (13 मे 2025) : घरफोड्या करणार्या अट्टल चोरट्यांना जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेला एक लाख 85 हजार रुपये किंमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जगवानीनगर गेटसमोर असलेल्या एका दुकानाचे शटर उचकावून आणि चैनल गेट तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. त्यांनी दुकानातून सुमारे 350 किलो वजनाचे 65 हजार रुपये किंमतीचे जुने तांबे आणि 150 किलो वजनाच्या एक लाख 20 हजार रुपये किंमतीच्या नवीन तांब्याच्या तारा असा एकूण एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. पथकातील पोलीस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, रितेश संतोष आसेरी (वय 46, रा. रणछोडदास नगर, जळगाव) याला त्याच्या घरातून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचा साथीदार रणजीतसिंग जिवनसिंग जुन्नी (वय 32) याला पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, किरण पाटील आणि राकेश बच्छाव यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून पाठलाग करून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांच्या मदतीने हस्तगत करण्यात आला. सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे आणि अक्रम शेख यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी आरोपींकडून 54 हजार रुपये किमतीचे 100 किलो वजनाचे जुने आणि नवीन तांब्याचे तार जप्त केले आहेत. सध्या या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाळे, अक्रम शेख आदींच्या पथकाने केली.
