भुसावळात पाणी पेटले : पालिकेत रिपब्लिकन सेनेचे ‘मटके फोडो’ आंदोलन

48 तासांच्या अल्टिमेटमनंतर आंदोलन ; मागण्या न मानल्यास ठिय्या आंदोलनासह अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा


Water Issue Ignites Tensions in Bhusawal: Republican Sena Stages ‘Matke Phodo’ (Pot-Smashing) Protest at Municipal Council भुसावळ (3 जुलै 2026) : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर रिपब्लिकन सेनेने शुक्रवार, 3 रोजी भुसावळ नगरपरिषदेत आक्रमक पवित्रा घेत ‘मटके फोडो’ आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. शेळगाव बॅरेज आणि हतनूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संघटनेने केला.
रिपब्लिकन सेनेने यापूर्वी नगरपरिषदेला 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने दुपारी 12 वाजता नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.

तर अधिकार्‍यांना काळे फासणार
रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले की, शेळगाव बॅरेज आणि हतनूर धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना केवळ नगरपरिषदेच्या नियोजनातील त्रृटींमुळे भुसावळकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांवर होत असलेला हा अन्याय सहन केला जाणार नाही. भुसावळातील पाणीप्रश्न न सुटल्यास प्रसंगी अधिकार्‍यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल.


हलगर्जीपणा करणार्‍यांवर व्हावी कारवाई
आंदोलनादरम्यान संघटनेने प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या. त्यामध्ये शहरातील पाणीपुरवठ्याचे रोस्टर तातडीने जाहीर करावे, ‘आलम-जेली’चा आवश्यक साठा उपलब्ध करून नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा तसेच पाणीपुरवठा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबाबत संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी व या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल तसेच जबाबदार अभियंत्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा थेट इशारा विनोद सोनवणे यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
या आंदोलनात रिपब्लिकन महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे (मेजर), भुसावळ शहराध्यक्ष लिलाधर सपकाळे, आयटी प्रमुख स्वप्नील सोनवणे, बंटी नरवाडे, शर्मिला तायडे, उषा पाटील, विक्रम वानखेडे, पंकज नरवाडे, भारत गोफणे, दीपक सुरवाडे, दिलीप क्षीरसागर, विशाल नरवाडे, विजया वाघोदे, मीना भालेराव, पंकज बोदडे, नानू सूर्यवंशी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !