वीर सैनिकांच्या सन्मानार्थ देशभरातील रेल्वे स्थानके रोशनाईने उजळली

Railway stations across the country lit up in honour of brave soldiers भुसावळ (15 मे 2025) : ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य व पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी देशभरातील रेल्वे स्थानके रोशनाईने उजळली. वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत राष्ट्रभक्तीचा एक वेगळाच उत्साह रेल्वे स्थानकांवर पाहायला मिळाला.
तिरंग्याच्या रोषणाईत न्हालेल्या रेल्वे परिसरात देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारले गेले. स्थानकांवरील स्क्रीनवर दाखवले जाणारे देशभक्तिपर दृक्चित्र प्रवाशांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागवणारे ठरले.

ऑपरेशन सिंदूरच्या यशोगाथेचा संदेश देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेने विविध भागांमध्ये ’तिरंगा यात्रा’ चे आयोजन केले. या यात्रेने जनतेच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम आणि सैन्याबद्दलचा सन्मान अधिक दृढ केला. तसेच, या यात्रेसोबतच विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या नुक्कड नाटकांच्या माध्यमातूनही ऑपरेशन सिंदूरची शौर्यगाथा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवली गेली.
भारतीय रेल्वेच्या या उपक्रमामुळे फक्त रणांगणातील शूर वीरांचे गौरवच झाले नाही, तर सामान्य नागरिकांनाही ऑपरेशन सिंदूरच्या शौर्यगाथेशी जोडले गेले. हा उपक्रम हे दाखवून देतो की देशातील प्रत्येक नागरिक आपल्या वीर सैनिकांसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर न्याय मिळवण्यासाठी सुरू झालेले ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सैन्याची गौरवशाली गाथा आहे, जी येणार्या पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
