भुसावळात उद्या मंत्री रक्षा खडसे, संजय सावकारे यांच्या उपस्थितीत ‘योग संगम’ कार्यक्रम

‘Yoga Sangam’ program to be held in Bhusawal tomorrow in the presence of Ministers Raksha Khadse and Sanjay Savkare भुसावळ (20 जून 2025) : अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भुसावळ शहरात ‘योग संगम’ या भव्य कार्यक्रमाचे शनिवार, 21 जून रोजी सकाळी सहा वाजता सेन्ट्रल रेल्वे मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, भारत सरकार, सेंट्रल रेल्वे भुसावळ विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि भारतीय खेळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
यांची असेल उपस्थिती
या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भारतीय खेळ प्राधिकरणाचे क्षेत्रीय निदेशक पांडुरंग चाटे आणि राजेंद्र फातले हे देखील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
‘योग संगम’ कार्यक्रमामध्ये योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी, विविध शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांचे सामूहिक सत्र आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीची प्रेरणा देणे हा यामागचा उद्देश आहे.
भुसावळ शहर आणि परिसरातील सर्व नागरिकांना या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सकाळी सहा वाजेपूर्वी उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे, संपूर्ण जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब असून, केंद्र सरकारच्या उपक्रमांना स्थानिक पातळीवर पाठबळ देण्याचा आणि योगसाधनेला सामूहिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न भुसावळमधून होत आहे.
