भुसावळ-वरणगाव महामार्गावर बल्कर चालकांची मुजोरी : अपघातांचा धोका वाढला


Bulker Drivers’ High-Handedness on Bhusawal-Varangaon Highway: Risk of Accidents Rises भुसावळ (13 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून फ्लाय अ‍ॅश (राख) वाहतूक करणार्‍या बल्कर वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. महामार्गावर दोन्ही बाजूंनी बेशिस्तपणे वाहन पार्किंग केल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चालकांची मुजोरी वाढली
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील 210, 500 आणि 660 मेगावॉट प्रकल्पांमधून दररोज दिवस-रात्र हजारो बल्करद्वारे फ्लाय अ‍ॅशची वाहतूक केली जाते. विशेषतः 500 मेगावॉट प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर विविध कंपन्यांची बल्कर वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. येथे सुरक्षा रक्षकांकडून गेट पास तपासणी केली जात असली तरी, त्यांच्या समोरच चालक महामार्गाच्या मध्यभागी तसेच दोन्ही बाजूंनी वाहने उभी करून गेट पास काढताना दिसतात मात्र या प्रकाराला कोणीही आळा घालत नसल्याने चालकांची मुजोरी वाढत चालली आहे.

नागरिकांना मोठा धोका
विशेष म्हणजे, 660 मेगावॉट प्रकल्पाजवळ राख वाहतुकीसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध असूनही चालकांकडून तिचा वापर टाळला जात आहे. परिणामी, दीपनगरसमोरील वरणगाव-भुसावळ महामार्गावर तसेच सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात बेशिस्त पार्किंग होत आहे. या बेशिस्तपणामुळे रस्ता ओलांडणार्‍या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या बल्करमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. दीपनगर परिसरातील कामगार, कंत्राटी कर्मचारी तसेच शाळकरी विद्यार्थी रोज जीव मुठीत धरून या मार्गाने प्रवास करत आहेत. अनेकदा लहान-मोठे अपघात घडत असूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बेशिस्त बल्कर चालकांवर हवी कठोर कारवाई
नव्याने रुजू झालेले मुख्य अभियंता विराज चौधरी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन बेशिस्त बल्करचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दीपनगरवासीयांकडून होत आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !