गर्दीत तुमच्या मोबाईलसह पाकिटाची होवू शकते चोरी : पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांची भुसावळात जनजागृती
भुसावळ (15 एप्रिल 2026) : शहरातील गजबजलेल्या आठवडे बाजारात खरेदीसाठी येणार्या नागरिकांचे मोबाईल आणि पाकीट लंपास करणार्या चोरट्यांविरुद्ध आता बाजारपेठ पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केवळ गुन्हे दाखल करण्यावर मर्यादित न राहता, पोलिसांनी थेट मैदानात उतरून विद्यार्थ्यांनी रॅली काढत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. रविवारी आठवडे बाजारात डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी एनसीसी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने अनोखी जनजागृती मोहीम राबवली. थेट बाजारात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.
नागरिकांना केले आवाहन
आठवडे बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे हातसाफ करतात. हे रोखण्यासाठी पोलिसांनी एनसीसी विद्यार्थ्यांच्या मदतीने हातात फलक घेऊन रॅली काढली. ’मोबाईल वरच्या खिशात ठेवू नका’, ’पाकीट मागच्या खिशात ठेवणे टाळा’ अशा स्पष्ट सूचना या फलकांद्वारे देण्यात आल्या.शहरातील अष्टभुजा देवी चौक आणि मुख्य आठवडे बाजारात ही मोहीम राबवण्यात आली. सकाळी 10 वाजपासूनच पोलिस निरीक्षक वाघ व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी हे शहरातील आठवडे बाजार व जामनेर रोडवर गर्दीच्या ठीकाणी जानजागृती केली.

पोलीस निरीक्षकांचे ‘लाईव्ह’ प्रात्यक्षिक
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधला.चोरटे गर्दीत कशा प्रकारे वावरतात आणि लोकांचे लक्ष विचलित करून मोबाईल कसे चोरतात, याची माहिती त्यांनी दिली.मोबाईल वरच्या खिशात ठेवला की तो सहज काढता येतो, तसेच मागच्या खिशातून पाकीट वर आलेले असते, जे चोरट्यांसाठी सोपे लक्ष्य ठरते, असे वाघ यांनी नागरिकांना समजावून सांगितले.
नागरिकांकडून मोहिमेचे कौतुक
पोलीस आणि विद्यार्थ्यांनी मिळून राबवलेल्या या मोहिमेचे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांनी स्वागत केले. विशेषतः एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत नागरिकांना चोरीच्या पद्धतींपासून सावध केले. यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजारपेठ पोलिसांनी आता गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवली असून, संशयितांची धरपकड सुरू करणार आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी स्वतःच्या वस्तूंची काळजी घेणे हीच चोरी रोखण्याची पहिली पायरी आहे. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा. नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत चोरीच्या तक्रारींवर आता अधिक जलद गतीने कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सहकार्यानेच गुन्हेगारीला लगाम घालता येईल. मोबाईल चोरीला गेल्यावर नागरिकांनी थेट ऑनलाईन सीईआयआर पोर्टलवर माहिती भरून द्यायची आहे. त्यामुळे पोलिस त्या मोबाईलचा तपास करतात, तक्रार करण्यास पोलिस ठाण्यात सुध्दा जायची गरज नाही, असे पोलीस निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.









