प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींचे लैंगिक शोषण ; चार आरोपींना अटक


Sexual Exploitation of Young Women Lured into a ‘Love Trap’ ; Four Accused Arrested अमरावती (15 एप्रिल 2026) : परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली. दरम्यान, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप करत संबंधित आरोपीने 180 तरुणींचे शोषण केले आणि सुमारे 350 अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल केल्याचा दावा केला आहे.

आतापर्यंत चौकडीला अटक
या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक करण्यात आली.. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींनी प्रेमाच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे समोर येत असून हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

अश्लील व्हिडिओ जप्त !
तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ आढळल्याची माहिती मिळत आहे. हे व्हिडिओ इतर साथीदारांना पाठवले गेले का, याचा शोध घेतला जात आहे. काही व्हिडिओ सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाल्याचेही समोर आले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केला असला, तरी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तो पुन्हा मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास सुरू ठेवला असून महिला अधिकारी आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने सात पीडित तरुणींची नावे उघड केली आहेत. न्यायालयाने मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !