भुसावळात ‘बिसारा लेडीज इक्वलिटी रन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
295 महिलांची दमदार धाव : आरोग्य व सक्षमीकरणाचा संदेश; महिलांच्या उत्साहाने शहर भारावले
भुसावळ (13 एप्रिल 2026) : महिलांचे आरोग्य, सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘लेडीज इक्वलिटी रन 2026’ स्पर्धा रविवारी रेल्वे क्रीडांगणावर अत्यंत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत तब्बल 295 महिलांनी सहभाग नोंदवत शहरात आरोग्याचा जागर घडवून आणला.
महिलांच्या चेहर्यावर ओसंडला आनंद
सकाळी सहा वाजता मुख्य अतिथी डीआरएम पुनीत अग्रवाल, स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ज्ञानेश्वर बढे तसेच सदिच्छादूत कॉम्रेड मॅरेथॉन धावपटू डॉ. अर्चना काबरा यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. 3 किमी, 5 किमी व 10 किमी अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. विशेषतः 5 व 10 किमी धाव ठऋ खऊ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पार पडल्यामुळे प्रत्येक धावपटूला आपला वेळ त्वरित मोबाईलवर प्राप्त होत होता, ज्यामुळे सहभागी महिलांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

धावपटूंनी वेधले लक्ष
जामनेर रोडवरून धावणार्या महिला धावपटूंनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. मार्गावर विविध सामाजिक संस्थांनी पाणी, एनर्जी ड्रिंक, बिस्कीट, लिंबूपाणी व चॉकलेटची व्यवस्था करून धावपटूंना प्रोत्साहन दिले. लॉयन्स क्लब, रोटरी रेल सिटी, राधाकृष्ण प्रभात फेरी, झुलेलाल रन व सकल लेवा महिला मंडळाच्या सदस्यांनी ठिकठिकाणी स्वागत करत पुष्पवृष्टी केली. त्यामुळे स्पर्धेला उत्साहाबरोबरच भावनिक रंगही लाभला.
तसेच तु.स.झोपे प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे धावपटूंचा उत्साह वाढविला. स्पर्धेपूर्वी योगा मास्टर पूनम कुलकर्णी यांनी वॉर्म-अप तर स्पर्धेनंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज घेतली.
स्पर्धा पूर्ण केल्यानंतर प्रत्येक महिला धावपटूला आकर्षक पदक प्रदान करण्यात आले. गळ्यात पदक पडताच कष्टाचे चीज झाल्याची समाधानाची भावना प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होती. त्यानंतर पौष्टिक नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली.
बक्षीस वितरण समारंभात 5 किमी व 10 किमी गटातील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. 5 किमीमध्ये जानवी रोझोदे प्रथम, छाया ढोले द्वितीय व अश्विनी महाजन तृतीय ठरल्या. 10 किमीमध्ये तेजस्विनी ढाके प्रथम, एकता भगत द्वितीय व नंदा तायडे तृतीय स्थानावर राहिल्या.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमावेळी डीआरएम पुनीत अग्रवाल, वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक उमेश महाले, ज्ञानेश्वर बढे, डॉ.अर्चना काबरा, संजय कुकरेजा, वैशाली पाटील, प्रवीण फालक व डॉ.चारुलता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी तसेच वाहतूक पोलीस विभागाने विशेष सहकार्य केले. योग्य वाहतूक नियोजनामुळे सर्व महिला धावपटूंनी सुरक्षितपणे धाव पूर्ण केली.









