राज्यभरात चैन चोरीत कुख्यात भुसावळातील ‘आतंक इराणी’ पोलिसांच्या जाळ्यात
राज्यभरातील अनेक जिल्ह्यात आरोपी वॉण्टेड : अनेक गुन्हे उघडकीस येणार
‘Atank Irani’—a notorious chain snatcher from Bhusawal infamous across the state—has been nabbed by the police. भुसावळ (13 एप्रिल 2026) : राज्यभरातील पोलिसांना वॉण्टेड असलेला व सिनेस्टाईल चैन स्नॅचिंग करून अलगद पसार होण्यात माहिर असलेल्या भुसावळातील कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीविरोधात राज्यभरात गुन्हे दाखल असून ठिकठिकाणचे पोलिस आरोपीचा शोध घेत होते मात्र तो गवसत नव्हता. आरोपी भुसावळात येताच त्यास दबा धरून असलेल्या पथकाने बेड्या ठोकल्या.
अनेक जिल्ह्यांत आरोपी ‘मोस्ट वॉन्टेड’
आरोपी सादिक अली याने राज्याच्या विविध भागांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याने तो राज्यभरातील पोलिसांच्या रडारवर होता मात्र त्याचा ठावठिकाणा गवसत नसल्याने दरवेळी पोलिस रिकाम्या हाताने परतत होते. आरोपी भुसावळ शहरात येणार असल्याची बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यास नुकतेच सापळा रचून पकडण्यात आले.

या पोलिस ठाण्यात आरोपी वॉण्टेड
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीविरोधात जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण तसेच वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल असून त्या पोलिस ठाण्यात तो गुन्ह्यात वॉण्टेड आरोपी आहे. टप्प्या-टप्प्याने आरोपीचा आता संबंधित पोलिस ठाणे आरोपीचा ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, डी.बी.पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कापडे आदींच्या पथकाने केली.









