भरधाव आयशर प्रवासी रिक्षावर आदळली : चाळीसगावच्या महिलेसह दोघे ठार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात : रिक्षातील पाच प्रवासी जखमी


Speeding Eicher Crashes into Passenger Rickshaw: Two Dead, Including Woman from Chalisgaon शिरपूर (22 एप्रिल 2026) : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी रिक्षावर पाठीमागून भरधाव वेगात आलेला आयशर ट्रक आदळून झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील प्रवासी तथा चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी महिलेसह हिसाळे, ता.शिरपूर येथील प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, आयशरच्या धडकेने प्रवासी रिक्षा तब्बल शंभर ते दिडशे फूट फरफटत ओढली गेली. या अपघातात रिक्षातील चार ते पाच प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल आरतीजवळ घडला.

दोघे जागीच ठार
भीषण अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (46, रा.पिंपरखेड, ता.चाळीसगाव) व बंटी किशन जाधव (32, रा.हिसाळे, ता.शिरपूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की रिक्षाचा पूरता चुराडा झाला.

अपघातानंतर उडाला गोंधळ
शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे प्रवासी रिक्षा महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे असतानाच याचवेळी मागून भरधाव आलेला आयशर (डी.डी. 01 जी.9752) पाठीमागे येवून आदळला.अपघातानंतर जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, या अपघातात चार ते पाच प्रवासीही जखमी झाले असून पोलिसात या संदर्भात नोंद करण्यात आली आहे. अवैध वाहतुकीद्वारे होणारी धोकेदायक वाहतूक या अपघाताने प्रकर्षाने समोर आली असून वाढत्या अपघाताने चिंता व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !