जामनेर तालुक्यात ‘सैराट’ची पुनरावृत्ती : आंतरजातीय प्रेमविवाहाच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला ; आरोपीला अटक

तरुणाची प्रकृती गंभीर : बहिणीने पळून जावून प्रेम विवाह केल्याचा वाद अनावर


‘Sairat’-like incident in Jamner Taluka : Youth brutally attacked following dispute over inter-caste love marriage; accused arrested फत्तेपूर (बुधवार, 29 जुलै 2026) : बहिणीने पळून जावून तरुणासोबत आंतरजातीय प्रेम विवाह केल्यानंतर संतप्त भावाने बहिणीच्या पतीवर दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील तोरनाळे जंगल परिसरात घडली. या प्रकरणी तरुणाविरोधात फत्तेपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संशयीत तरुणाला अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या माहितीनुसार, प्रशांत सुभाष चौधरी (26, सुभाषपूरा, फत्तेपूर) या तरुणाने रोशनी या तरुणीसोबत सिल्लोड येथे पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला.

या विवाहाचा राग मनात धरून तरुणीचा सख्खा भाऊ अभिषेक मोरे (19) याने प्रशांत चौधरी याच्यावर दगडाने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना तोरनाळे, ता.जामनेर घाटातील बंदी परिसरात 27 ते 28 दरम्यान घडली. या हल्ल्यात प्रशांत चौधरी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी सरला नामदेव चौधरी (50, फत्तेपूर, ता.जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत अभिषेक संतोष मोरे (19, वडगाव सदो, ता.जामनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

मानवी मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह
ही घटना म्हणजे आंतरजातीय विवाहांविषयी समाजातील काही घटकांमध्ये अजूनही असलेल्या जातीय मानसिकतेचे आणि सामाजिक वास्तवाचे विदारक चित्र अधोरेखित करणारी ठरत आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करण्याचा अधिकार दिलेला असताना, अशा घटनांमुळे सामाजिक सलोखा आणि मानवी मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !