नागपूर हादरले : रेडीओच्या आवाजावरून वादात माजी भाडेकरूने केली महिलेची हत्या : घरमालक दाम्पत्य गंभीर
नागपूर (बुधवार, 29 जुलै 2026) : रेडीओचा आवाज कमी करण्यावर झालेल्या वादाचा राग डोक्यात ठेवून जुन्या भाडेकरून घर मालकांवर तलवार व चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात घर माकाच्या मेहुणीचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अंगावर काटा आणणारा संपूर्ण प्रसंग सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे.
काय आहे प्रकरण ?
नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरनगर परिसरात मंगळवारी सकाळी धर्मपाल डहाट (घरमालक), त्यांची पत्नी वनिता डहाट आणि त्यांच्या घरी पाहुण्या म्हणून आलेल्या मेहुणी संगीता राजू चौधरी हे तिघे घरात उपस्थित होते. त्याचवेळी डहाट यांचा माजी भाडेकरू रोशन नीळकंठराव तराळ हा अचानक हातात तलवार आणि चाकू घेऊन घरात शिरला. कुणालाही काही समजण्याच्या आतच त्याने या तिघांवरही सपासप वार करण्यास सुरुवात केली.
संगीता चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू
या प्राणघातक हल्ल्यात संगीता चौधरी यांच्या वर्मी घाव लागल्याने त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या हल्ल्यात घरमालक धर्मपाल आणि त्यांच्या पत्नी वनिता हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात या भीषण हल्ल्यामागचे कारण अत्यंत क्षुल्लक असल्याचे समोर आले आहे. आरोपी रोशन तराळ हा पूर्वी डहाट कुटुंबाकडे भाड्याने राहायचा. त्यावेळी घरात मोठ्या आवाजात रेडिओ लावण्याच्या कारणावरून घरमालक आणि भाडेकरू रोशन यांच्यात मोठा वाद झाला होता. याच जुन्या वादाचा राग रोशनने मनात धरून ठेवला होता आणि त्यातूनच त्याने हे टोकाचे आणि क्रूर पाऊल उचलले.
आरोपीला नागरिकांनी पकडले
भीषण आणि रक्तरंजित हल्ला केल्यानंतर आरोपी रोशन पळून न जाता घरातच शांत बसून राहिला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच परिसरातील तरुणांनी आणि नागरिकांनी धाडस दाखवले. त्यांनी प्रसंगावधान राखून आरोपीला बाहेरून त्याच खोलीत कोंडून ठेवले आणि तत्काळ एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडून आरोपी रोशनला ताब्यात घेतले.