भोंदू खरातचा नवा कारनामा : अवतार पूजेच्या नावाखाली नऊ कोटींची फसवणूक
The Latest Scam by the Charlatan Kharat : Fraud Worth Nine Crores Under the Guise of Avatar Worship नाशिक (25 एप्रिल 2026) : नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या नवनवीन कारनाम्यांची सर्वत्र चर्चा आहे. आतापर्यंत तब्बल 17 गुन्हे दाखल असलेल्या खरातविरोधात नाशिकमधील सरकारवाडा पोलिसात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला. अवतार पूजेच्या बहाण्याने एका चार्टर्ड अकाउंटंटची आठ कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
पीडित सीए ललित पोफळे हे खरातच्या ट्रस्टशी संबंधित होते आणि ते विश्वस्त म्हणून काम पाहत होते त्यामुळे ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना सखोल माहिती होती. याच ओळखीचा फायदा घेत खरातने त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याचे सांगून घाबरवले. या भीतीतून सुटका करण्यासाठी अवतारपूजा करण्याचा सल्ला देत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

रॅकेट उघडणकीस येण्याची शक्यता
या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोफळे यांची याआधी पोलिसांनी चौकशी केली असता, खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली होती. ट्रस्टमधील आर्थिक हालचाली आणि पैशांचा वापर याबाबत अधिक तपास सुरू असून, या नव्या गुन्ह्यामुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 17 गुन्हे दाखल
दरम्यान, अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढतच चालली आहे. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे नोंदवले गेले आहेत. धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे आणि महिलांचे शोषण करणे, हीच त्याची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे.
दरम्यान, महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने त्याचा ताबा घेतला असून न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
