नायब तहसीलदार भीषण अपघातात ठार
Deputy Tehsildar Killed in Horrific Accident पुणे (26 एप्रिल 2026) : जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52) यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बनकरफाटा-जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील ’एस कॉर्नर’ परिसरात एका हायवा डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानंतर हा अपघात झाला.
असा घडला अपघात ?
महसूल विभागातील अधिकारी अनंता गवारी हे त्यांच्या होंडा सिटी कारने बनकरफाटाच्या दिशेने निघाले असताना ‘एस कॉर्नर’ वळणावर समोरून म्हणजेच पांगरीमाथा बाजूकडून येणार्या एका हायवा डंपरने त्यांच्या कारला समोरासमोर भीषण धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या उलट दिशेला फेकले गेले. या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली.

रस्त्यातच नायब तहसीलदारांचा मृत्यू
या भीषण अपघातात अनंता गवारी आणि महसूल कर्मचारी विजय खारतोडे गंभीर जखमी झाले, तर तुषार कोरडे यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने ओतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अनंता गवारी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारांसाठी पुण्याकडे हलवण्यात आले. अत्यंत दुर्दैवाने, पुण्याला नेत असतानाच नायब तहसीलदार अनंता गवारी यांची वाटेतच प्राणज्योत मालवली, ज्यामुळे महसूल विभागात मोठी शोककळा पसरली.
