भीषण अपघातात तिघे ठार
मुंबई (27 एप्रिल 2026) : मरीनड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वृद्धाला दोन बाईकस्वारांनी धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक ज्येष्ठ व्यक्ती, एक तरुण आणि तरुणीचा समावेश आहे. सकाळी पावणेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
काय घडले मुंबईत ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्ती सोमवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास मरीन ड्राईव्हूज्ञ मॉर्निंग वॉकसाठी आले होते. त्यावेळी रस्त्यावरुन दोन बाईक वेगाने जात होत्या. या दोन्ही मोटारसायकलनी या ज्येष्ठ व्यक्तीला धडक दिली त्यामुळे बाईकवरील तरुण-तरुणीही खाली पडले. दोन्ही बाईक खूप वेगात असल्याने वृद्ध व्यक्ती आणि बाईकवर असणार्यांना गंभीर दुखापत झाली होती.

या घटनेची वर्दी मिळाल्यानंतर पोलीस तातडीने याठिकाणी आले आणि जखमींना तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना संपर्क साधला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. तर दुसर्या बाजूला मरीनड्राईव्ह पोलीस हा अपघात नेमका कसा घडला, याचा तपास करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही बाईकची चाकं, सायलेन्सर आणि चेसिसचा भाग निखळून पडला होता. या दोन्ही बाईक खूप वेगात होत्या. कदाचित नाईट आऊट करुन हे बाईकस्वार घरी जात असावेत. दोन्ही बाईक एकमेकांपासून जवळच्या अंतरावर होत्या. या दोन्ही बाईकने वृद्ध व्यक्तीला धडक दिली. या बाईकस्वारांमध्ये रेस सुरु होती का, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
