भुसावळात बसमध्ये चढताना विवाहितेचे सव्वातीन लाखांचे मंगळसूत्र चोरले : यावलच्या महिलेला बाजारपेठ पोलिसांच्या बेड्या
Married Woman’s Mangalsutra Worth ₹3.25 Lakhs Stolen While Boarding Bus in Bhusawal; Yawal Woman Arrested by Bazarpeth Police भुसावळ (27 एप्रिल 2026) बसमध्ये चढताना गर्दी असल्याचा फायदा घेत मुक्ताईनगरातील विवाहितेचे तीन लाख 20 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवण्यात आले होते. चोरीची घटना रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास भुसावळ बसस्थानकात घडली होती. बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासचक्रे फिरवत संशयीत कुलसूमबी मुस्ताक शेख (यावल) या महिलेला ताब्यात घेत तिच्याकडून चोरी केलेली पोत जप्त केली. या महिलेच्या अटकेनंतर काही चोर्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काय घडले बसस्थानकात ?
तक्रारदार कुसुम बेदीदास चौधरी (62, रा.शिवाजी नगर, मुक्ताईनगर) या 23 रोजी सकाळी गावी जाण्यासाठी निघाल्यानंतर भुसावळात आल्या व चोपडा गाडी आल्यानंतर त्यात सकाळी 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (सुमारे 3.20 लाख रुपये किंमतीची) लांबवली होती. त्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे संशयित महिलेला अटक करण्यात आली व तिने चोरी केलेली तीन लाख 20 हजार रुपये किंमतीची पोत काढून दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल अक्षय कोतकर, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल चंद्रकांत रायपूरकर, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल अमर आढाळे, कॉन्स्टेबल दिलीप कोल्हे, कॉन्स्टेबल जीवन कापडे, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, कॉन्स्टेबल शिल्पा राठोड आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.
