कंडारी परिसरात धुमाकूळ घालणारे दोन्ही बिबटे वनविभागाच्या जाळ्यात
बोकडाच्या आमिषाने येताच पिंजर्यात अडकले : नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास
Both leopards wreaking havoc in the Kandari area have been captured in the Forest Department’s traps. भुसावळ (27 एप्रिल 2026) : गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीने त्रस्त असलेल्या कंडारी परिसर, मिलिटरी स्टेशन, आयुध निर्माणी परिसरातील नागरिकांनी रविवारी सुटकेचा श्वास घेतला. गेल्या दहा दिवसांपासून मिलिटरी स्टेशन परिसरात लावलेल्या दोन्ही पिंजर्यात नर व मादी बिबट्या बोकडाची शिकार करण्यासाठी येताच अडकले. वनविभागाने दोन्ही हिंस्त्र प्राण्यांना ताब्यात घेतले असून त्यांची सुरक्षित अधिवासात रवानगी करण्यात येणार आहे.
वर्षभरापासून बिबट्यांचा अधिवास
जानेवारी 2025 पासून बिबट्यांचा या परिसरात अधिवास आढळून आला होता तर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत होती. वन विभागाने 10 दिवसांपासून या भागात दोन पिंजरे लावले होते. शनिवार, 25 रोजी मध्यरात्री मिलिटरी स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या पिंजर्यांमध्ये नर आणि मादी असे दोन बिवटे जेरबंद झाले.

सातत्याने बिबट्याचा वावर
28 जानेवारी 2025 रोजी मिलिटरी स्टेशनच्या फिल्टर हाऊसजवळ गस्तीवर असलेल्या जवानाला सर्वांत प्रथम बिबट्याचे दर्शन झाले होते तर आयुध निर्माणी कर्मचारी वस्सहत, केंद्रीय विद्यालय या परिसरात अनेकदा बिबट्याचा वावर दिसला होता. कंडारीचे पोलिस पाटील रामा तायडे यांनी याबाबत अनेकवेळा वन विभागाकडे पिंजरे लावण्याची मागणी केली होत. मात्र वन विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. यानंतर पुन्हा तक्रारी वाढल्याने वन विभागाने गेल्या दहा दिवसांपासून मिलिटरी स्टेशनमध्ये दोन स्वतंत्र पिंजरे लावले. दहा दिवसांपासून त्यात बोकड बांधून ठेवण्यात आले तर शनिवारी मध्यरात्रीनंतर दोन्ही पिंजर्यांमध्ये एक नर व एक मादी बिबटे जेरबंद झाले. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशानुसार या दोन्ही बिबट्यांना सोमवारी ात्री त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई उपवनसंरक्षक (जळगाव) श्रीराम धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण, मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी कृपाली शिंदे, वनपरिमंडळ अधिकारी सलाउद्दीन पिंजारी, वनरक्षक वैशाली कुलकर्णी व जीवरक्षक विवेक देसाई आदींनी केली.
