जळगावात भीषण अपघात : भरधाव ट्रकने 25 वर्षीय युवकाला चिरडले
Horrific Accident in Jalgaon: Speeding Truck Crushes 25-Year-Old Youth जळगाव (27 एप्रिल 2026) : शहरात अपघातांची मालिका कायम असून शहरातील मानराज पार्क चौफुली येथे झालेल्या भीषण अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल. ओम सुनील गिरी (25) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
भीषण अपघाताने मन सुन्न
ओम गिरी हा तरुण दुचाकीवरून जात असताना अचानक भरधाव ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ओमचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघाताने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच ओमच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत ओमच्या आई आणि बहिणीचा आक्रोश पाहून उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. या हृदयद्रावक दृश्यामुळे परिसरात शोककळा पसरली होती.
दरम्यान, अपघातामुळे काही काळासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी आणि उपस्थितांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.
या घटनेनंतर मानराज पार्क चौफुली हा अपघातप्रवण ठिकाण असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. येथे वारंवार अपघात होत असल्याने स्पीड ब्रेकर तसेच सिग्नल यंत्रणा बसविण्याची जोरदार मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमर जैन, सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, राहुल पाटील तसेच उपमहापौर मनोज चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करत परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.
