एक लाखाच्या बदल्यात पाच लाख : धानोर्‍यातील व्यापार्‍याला जळगावात गंडा


Five Lakhs for One Lakh : Dhanora Trader Duped in Jalgaon जळगाव (28 एप्रिल 2026) : एक लाखाच्या बदल्यात पाच लाख देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी धानोरा, ता.चोपडा येथील व्यापार्‍याची पाच लाख 20 हजारात फसवणूक केली. शनीपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
फिर्यादी जगदीश शंकर व्यास (58, रा.धानोरा, ता.चोपडा) हे व्यापारी असून रविवार, 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजेपासून ते 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान ही फसवणुकीची मालिका घडली. पाच अज्ञात आरोपींनी फिर्यादीला गाठून एक लाखाचे पाच लाख देतो, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांचा मुलगा पंकज जगदीश व्यास (38) हा पैसे देण्यासाठी जळगाव शहरातील हॉटेल मुरली मनोहर (अजिंठा चौफुली) आणि हॉटेल कमल पॅराडाईज (भुसावळ रोड) परिसरात गेला होता.

संशयित पाच आरोपींनी साकेगाव हायवेजवळ कारमधून उतरून पंकज व्यास यांच्याकडून पाच लाख 20 हजारांची रोख रक्कम घेतली. पैसे मोजून घेतो असा बहाणा करत या टोळीने पंकज यांची नजर चुकवून रोख रकमेसह तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यास कुटुंबीयांनी शनीपेठ पोलिसात धाव घेतली.

जगदीश व्यास यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात पाच अज्ञात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय साजीद मजीद मन्सुरी करीत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस हायवेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. नागरिकांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !