जळगावात व्यापार्याचे पाच लाख 20 हजार लूटले : वाशिमच्या पोलिसासह त्रिकूटाला गुन्हे शाखेच्या बेड्या
Trader Robbed of ₹5.20 Lakhs in Jalgaon: Crime Branch Arrests Trio, Including a Policeman from Washim जळगाव (28 एप्रिल 2026) : एक लाखाच्या बदल्यात पाच लाख देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी धानोरा, ता.चोपडा येथील व्यापार्याची पाच लाख 20 हजारात फसवणूक करून दोन वाहनांद्वारे पळ काढला होता. गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव गुन्हे शाखेने वाशिम जिल्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे अटकेतील आरोपींमध्ये वाशिम मुख्यालयातील पोलिस अंमलदाराचा समावेश आहे तर एका आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहेत. या प्रकरणात चार आरोपी वॉण्टेड असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
पाच अज्ञात आरोपींनी फिर्यादीला गाठून एक लाखाचे पाच लाख देतो, असे आमिष दाखवले व जादा पैशांच्या मोहाला तक्रारदार व्यापारी जगदीश शंकर व्यास (58, रा.धानोरा, ता.चोपडा) हे बळी पडले. रविवार, 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजेपासून ते 27 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजेच्या दरम्यान फसवणूक झाली तर फिर्यादी यांचा मुलगा पंकज जगदीश व्यास (38) हा पैसे देण्यासाठी जळगाव शहरातील हॉटेल मुरली मनोहर (अजिंठा चौफुली) आणि हॉटेल कमल पॅराडाईज (भुसावळ रोड) परिसरात गेल्यानंतर संशयित पाच आरोपींनी साकेगाव हायवेजवळ कारमधून उतरून पंकज व्यास यांच्याकडून पाच लाख 20 हजारांची रोख रक्कम घेतली. पैसे मोजून घेतो असा बहाणा करत या टोळीने पंकज यांची नजर चुकवून रोख रकमेसह तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यास कुटुंबीयांनी शनीपेठ पोलिसात धाव घेतली.

गोपनीय माहितीवरून आरोपींना बेड्या
आरोपींनी पळण्यासाठी दोन कारचा वापर केल्यानंतर जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक गायकवाड यांना आरोपी करमाडा, जि.छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल एकताजवळ थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्यांच्यावर झडप घातली. त्रिकूटाला यावेळी अटक करण्यात यश आले तर चौघे साथीदार मात्र पसार झाले.
अटकेतील आरोपींमध्ये पोलिसाचा समावेश
प्रकाश लक्ष्मण शिंदे (40, रा.पेनबोरी, ता.रिसोड, जि.वाशिम), स्वप्नील दिलीप दळवी (33, रा.टिळक चौक, शिंपी वेटाळ, वाशिम) व भागवत दत्ताराव कष्टे (40, मु.पो.करडा, ता.रिसोड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर भागवत कष्टे हे वाशिम मुख्यालयात अंमलदार आहेत तर स्वप्नील दळवीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना शनीपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहा.फौजदार अतुल वंजारी, हवालदार प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रवींद्र कापडणे, छगन तायडे, चालक हवालदार प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने केली. तांत्रीक मदत गौरव पाटील, मिलिंद जाधव, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे आदींच्या पथकाने केली.
