फैजपूरसह वरणगावातून लाखोंचे सिलिंडर लांबवले : जळगावसह नशिराबादचे त्रिकूट गुन्हे शाखेच्या जाळ्यात
157 सिलिंडर जप्त ; गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता : अधीक्षकांकडून गुन्हे शाखेचे कौतुक
Cylinders Worth Lakhs Stolen from Faizpur and Varangaon: Trio from Jalgaon and Nashirabad Caught in Crime Branch’s Net भुसावळ (29 एप्रिल 2026) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव व यावल तालुक्यातील फैजपूर येथील गॅस गोदामातून लाखो रुपये किंमतीचे 157 सिलिंडर लांबवण्यात आले होते. जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यांची उकल करीत पूर्णपणे मुद्देमाल जप्त केला आहे शिवाय त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत.
या आरोपींना अटक
शेख बिलाल शेख नबी (31, कासोदा, ता.एरंडोल), वसीम खान शब्बीर खान (31, तांबापूरा, जि.जळगाव) व चेतन सुरेश काळे (38, नशिराबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

फैजपूरसह वरणगावातून केली चोरी
फैजपूर शहराजवळील पिंपरुड रोड परिसरातील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामात चोरट्यांनी शुक्रवार, 24 रोजी मध्यरात्री धुमाकूळ घालत तब्बल भरलेले शंभर सिलिंडर लांबवल्याचा प्रकार शनिवारी पहाटे उघडकीस आला होता. या प्रकरणी ललित रघुनाथ राणे यांनी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. वरणगाव शहरातील नरेंद्र उत्तमराव अहिरे (51) यांच्या गॅस गोदामातून 26 फेब्रुवारी 2026 रोजी चोरट्यांनी 72 हजार 846 रुपये किंमतीचे 57 सिलिंडर लांबवले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल होता. दोन्ही गुन्ह्यांची उकल करीत 157 सिलिंडर पोलिसांनी जप्त केले असून त्यात भारत गॅसचे 62 भरलेले व भारत गॅस कंपनीचे 95 खाली सिलिंडरचा समावेश आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले सुझूकी गाडी (एम.एच.19 ईयु 8871) देखील जप्त करण्यात आली असून आरोपींना फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक, संदीप गावीत, उपअधीक्षक अनिल बडगुजर, भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार प्रीतम पाटील, प्रेमचंद सपकाळे, सलीम तडवी, उमाकांत पाटील, यशंवत टहाकळे, श्रीकृष्ण देशमुख, बबन पाटील, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, मयुर निकम आदींच्या पथकाने केली. तांत्रीक मदत गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी केली.
