अवैध वाळू वाहतुकीसाठी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने लाच ; दोघे संशयीतांची पोलीस कोठडीत रवानगी


Bribe Demanded in the Name of Amalner Tehsildar for Illegal Sand Transport; Two Suspects Remanded to Police Custody अमळनेर (28 एप्रिल 2026) : अवैध वाळू वाहतूक करू देण्यासाठी अमळनेर तहसीलदारांच्या नावाने पन्नास हजारांची लाच मागून तडजोडीअंती 25 हजार रुपये स्वीकारताना दोघा खाजगी इसमांना धुळे एसीबीने अटक केली होती. रामराव हरचंद पाटील (64, लोणपंचम, ता.अमळनेर) व जितेंद्र राजेंद्र पाटील (26, झाडी, शिरसाळे, ता.अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार यांचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दोन ट्रॅक्टरने मांडळ येथील पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी खाजगी इसम रामचंद्र पाटील व जितेंद्र पाटील यांनी तक्रारदाराकडे अमळनेर तहसीलदारांच्या नावाने प्रति ट्रॅक्टर 25 हजार रुपये अशी 50 हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे प्रत्यक्ष तक्रार दाखल केली व मंगळवार, 28 रोजी पडताळणीअंती सापळा रचून दोघा आरोपींना अटक करण्यात आली.

तहसीलदारांची होणार चौकशी
खाजगी इसमांनी थेट तहसीलदारांच्या नावाने लाच मागितल्याने आता तहसीलदारांची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी सांगितले.

आरोपींच्या कबुली जवाबाकडे लक्ष
दोघा आरोपींना न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून त्यात ते काय कबुली देतात ? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. तपास उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !