जळगावात धाडसी घरफोडी : साडेनऊ लाखांचा ऐवज लांबवला
Audacious Burglary in Jalgaon : Valuables Worth ₹9.5 Lakhs Stolen जळगाव (29 एप्रिल 2026) : जळगावात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत धाडसी घरफोडी केल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील गुरुनानक परिसरातील कुटूंब लग्नानिमित्त बाहेर पडताच चोरट्यांनी संधीचे सोने केले. सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारत नऊ लाख 40 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
वाढत्या चोर्यांनी नागरिक धास्तावले
संतोष शामलाल आटवाल (40) हे जळगाव महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. रविवार, 26 एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबासह मालेगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. यावेळी त्यांनी घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घराच्या मागील बाजूचा दरवाजा लॉक केला होता.

मंगळवार, 28 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते घरी आल्यानंतर त्यांना घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे व चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी कपाट फोडत सामान विखुरला व कपाटातून 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत तीन लाख), 50 ग्रॅमचा सोन्याचा ब्रेसलेट (तीन लाख), 25 ग्रॅमचा ब्रेसलेट (1.5 लाख), 25 ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस व झुमके (1.5 लाख) आणि 40 हजार रुपये रोख असा एकूण नऊ लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी संतोष आटवाल यांनी तत्काळ शनिपेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यावनंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
