पिकअप-स्कॉर्पिओच्या भीषण धडकेत 16 मजुरांचा मृत्यू
16 Laborers Killed in Horrific Collision Between Pickup and Scorpio धार (1 मे 2026) : भरधाव पिकअप आणि स्कॉर्पिओच्या धडकेत 16 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात बुधवारी रात्री घडला. या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी दुःख व्यक्त केले. सरकारने मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा केली असून सर्व जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जागीच झाला मजुरांचा मृत्यू
भीषण अपघातात अनेक मजुरांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता तर 30 हून अधिक मजूर जखमी झाले होते मात्र उपचारादरम्यान आणखी चार मजुरांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा आता 16 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे. सध्या रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत तर दहाहून अधिक मजूर गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

वाहनांची जोरदार धडक
ही घटना तिरला पोलीस ठाणे हद्दीतील चिकलिया येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 46 मजूर बसले होते. यामध्ये महिला आणि मुलांचाही समावेश होता. अचानक पिकअप अनियंत्रित होऊन रस्त्याच्या दुसर्या बाजूला उलटली. त्यावेळी समोरून येणार्या वेगवान स्कॉर्पिओने पिकअपला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा चक्काचूर झाला आणि त्यातील मजूर रस्त्यावर इतरत्र फेकले गेले.
25 हून अधिक लोक जखमी
अंधारात मजुरांचा आक्रोश ऐकून जवळचे लोक आणि पेट्रोल पंप कर्मचारी मदतीसाठी धावून आले. या अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रात्री उशिरापर्यंत मृतांची संख्या 16 झाली. 25 हून अधिक लोक अजूनही जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती डॉ.छत्रपाल सिंह यांनी व्यक्त केली आहे.

