आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश ; 1745 कोटींचे कोकेन जप्त ; गृहमंत्र्यांकडून कारवाईचे कौतुक
International Drugs Racket Busted ; Cocaine Worth ₹1,745 Crore Seized ; Home Minister Praises Operation मुंबई (1 मे 2026) : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले असून अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे एक हजार 745 कोटी रुपये आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष कौतुक करत ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे म्हटले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यंत्रणेने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
अत्यंत गोपनीय पद्धत्तीने कारवाई
मुंबईत झालेली ही कारवाई देशातील ड्रग्जविरोधी मोहिमेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. एनसीबीच्या अधिकार्यांनी एका लहान खेपेपासून तपास सुरू करत अखेर संपूर्ण आंतरराष्ट्रीय जाळ्याचा मागोवा घेतला. या तपासातून मोठ्या प्रमाणावर कोकेन साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे देशात सक्रिय असलेल्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

अंमली पदार्थांचा नायनाटसाठी केंद्र सरकार कटीबद्ध
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, अमली पदार्थांच्या कार्टेल्सचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. त्यांनी नमूद केले की, एनसीबीने अत्यंत काटेकोर तपास करून लहान सुरागांपासून मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचत ही कारवाई केली आहे. हे ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या यशासाठी एनसीबीच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.
नागपूरात आता रस्त्यावरच तपासणी
राज्यात अंमली पदार्थांविरोधात कडक पावले उचलण्याची तयारीही सुरू झाली आहे. नागपूरमध्ये महाराष्ट्र दिनापासून अत्याधुनिक ड्रग्ज टेस्टिंग मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावरच वाहनचालकांची तपासणी करता येणार असून, अमली पदार्थांचे सेवन केल्यास तत्काळ रिपोर्ट मिळणार आहे त्यामुळे रेव्ह पार्टी किंवा रात्री उशिरा नशेत वाहन चालवणार्यांवर थेट कारवाई करणे शक्य आहे.

