जळगाव महापालिकेची फसवणूक : अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरोधात अखेर गुन्हा
जळगाव (2 एप्रिल 2026) : जळगाव महापालिकेची 42.60 कोटीत फसवणूक करणार्या अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अनेक वर्षांपासून गाजतेय प्रकरण
अटलांटा गैरव्यवहार प्रकरण गेल्या अनेक वर्षांपासून गाजत असले तरी यावर काहीही कार्यवाही होत नव्हती तर अलीकडेच या कंपनीने महापालिकेवर दावा करून 11 कोटी रूपयांची भरपाई न्यायालयाच्या माध्यमातून मागितली. यावर नगरसेवक अरविंद देशमुख, अॅड.दिलीप पोकळे आणि अॅड.शुचिता हाडा यांनी अनुक्रमे सर्वोच्च व उच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार म्हणून दाद मागितली. न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावत अटलांटा कंपनीला अकरा कोटी रूपये देण्याचा निकाल दिला आणि यानुसार महापालिकेने ही रक्कम अदा केली.

फसवणुकीची तक्रार अन् गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी अरविंद देशमुख यांनी शहर पोलीस स्थानकात अटलांटा कंपनीने फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
या फिर्यादीत नमूद केल्यानुसार अटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया कंपनीला 1996-97 ते 2001-02 या कालावधीत डांबरीकरणासह अन्य कामांचे तब्बल 256 कार्यादेश प्रदान करण्यात आले होते. यातील कामांचा अॅडव्हान्स म्हणून तब्बल 24 कोटी 38 हजार 480 रूपये प्रदान करण्यात आले होते. यात कंपनीने 19 कोटी 55 लाख 58 हजार 86 रुपये केलेल्या कामाचे म्हणून वसूल करण्यात आले तर कंपनीकडे 4 कोटी 79 लाख 42 हजार 394 रूपये 2001-02 पासून थकीत होते. यावर महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली असता सदर कंपनीने 11 जून 2005 रोजीच्या पत्रातून आपल्याकडे थकबाकी असल्याचे मान्य केले होते.
या थकीत रकमेवर महापालिका अधिनियमानुसार दरमहा 9 टक्के चक्रवाढ व्याज आणि 1997 पासून काम पूर्ण न केल्यामुळे पाचशे रुपये दररोजचा दंड अशी आकारणी एकूण तब्बल 42 कोटी 60 लाख 76 हजार 562 रूपये कंपनीकडून घेणे असल्याचे या फिर्यादीत नमूद केले आहे. यामुळे कंपनीने जळगाव शहर महापालिकेची वर नमूद केलेल्या रकमेची फसवणूक केली आहे. यामुळे अटलांटा कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड कंपनीचे संचालक राझू अंबालाल बाबरोट आणि संचालकांच्या विरूध्द फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा गुन्हा हा भादंवि कलम 406, 409 आणि 420 अंतर्गत दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सागर शिंपी हे करीत आहेत. एकीकडे महापालिकेकडून तब्बल अकरा कोटी वसूल करणार्या कंपनीच्या विरोधात तब्बल 42 कोटींच्या वर रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदविण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.