बिल मंजुरीसाठी लाच : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
Bribe for Bill Approval: Accounts Officer at Kulgaon-Badlapur Municipal Council Caught in ACB Net बदलापूर (2 एप्रिल 2026) : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर सहा टक्के कमिशनची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
कंत्राटदाराकडून मागितली लाच
या प्रकरणाची सुरुवात एका कंत्राटदाराच्या तक्रारीतून झाली. तक्रारदाराची ‘नवनिर्माण इंटरप्रायजेस’ नावाची कंपनी असून त्यांना नगर परिषदेच्या 77 रस्त्यांच्या कामांचे कंत्राट मिळाले होते. यातील काही कामे पूर्ण झाल्यानंतर 17 लाख 44 हजार रुपयांचे बिल आणि पूर्वीच्या कामांची 4 लाख 99 हजार रुपयांची सुरक्षा ठेव अशी एकूण 22 लाख 43 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली होती. मात्र ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी लेखाधिकारी चव्हाण यांनी मोबदल्याच्या स्वरूपात लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.

एकूण रकमेचा सहा टक्के मागितली लाच
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, एकूण रकमेच्या 6 टक्के म्हणजेच सुमारे 1 लाख 34 हजार 500 रुपये लाच म्हणून देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 9 डिसेंबर 2025 रोजी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने याची प्राथमिक पडताळणी सुरू केली.
पडताळणीत लाच मागणी स्पष्ट
10 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत चव्हाण यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. पुरावे गोळा केल्यानंतर अखेर 30 एप्रिल 2026 रोजी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत कलम 7 प्रमाणे विकास चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास चव्हाण हे वर्ग-1 दर्जाचे अधिकारी असून ते ठाण्यातील समता नगर परिसरात राहतात. या प्रकरणामुळे नगर परिषदेत बिल मंजुरीसाठी ‘टक्केवारी’ ठरलेली असते का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच या व्यवहारात इतर कोणत्या वरिष्ठ अधिकार्यांचा सहभाग होता का, याचाही तपास एसीबी करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आणखी मोठ्या स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.