चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत केल्या हत्या
Four-Year-Old Girl Raped and Murdered पुणे (2 एप्रिल 2026) : अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी चिमुकलीचा मृतदेह थेट पोलिस ठाण्याबाहेर ठेवून ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
आजीच्या गावी आल्यानंतर पीडीतेवर अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी आली होती. दुपारी घरासमोर खेळत असताना गावातील एका 65 वर्षीय नराधमाने तिला आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केल्यानंतर, आपले कृत्य उघड होऊ नये या भीतीने आरोपीने दगडाने ठेचून तिची हत्या केली. अत्यंत निर्दयीपणे त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगार्याखाली लपवून ठेवला.

सीसीटीव्ही आधारे पटली आरोपीची ओळख
दुपारपासून मुलगी बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. अखेर गोठ्यात तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी चिमुकलीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसला. या पुराव्यावरून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.
कठोर शिक्षा व्हावी- ग्रामस्थ
या घटनेची माहिती वार्यासारखी पसरताच गावकरी आक्रमक झाले. संतापलेल्या ग्रामस्थांनी नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी चिमुकलीचा मृतदेह भोर पोलिस स्टेशनच्या बाहेर आणून ठेवला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री चाणक्य म्हणून घेण्यात व्यस्त
सुषमा अंधारे म्हणाल्या की, चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठेचून मारले जाते, हे राज्याचे वास्तव आहे. आपण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागू नये, कारण सर्वसामान्यांच्या जगण्या-मरण्याशी त्यांना देणेघेणे नाही. ते स्वतःला ‘सुपरमॅन’ आणि ‘चाणक्य’ म्हणवून घेण्यात व्यस्त आहेत. आपण अत्यंत असुरक्षित राज्यामध्ये राहत आहोत, हेच यातून स्पष्ट होते.
नसरापूरच्या नराधमाला सोडणार नाही!
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नसरापूर येथील अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणार्या घटनेबाबत माझे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्यासोबत बोलणे झाले आहे. हे दुष्कृत्य करणार्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मी याबाबत सातत्याने शासन आणि प्रशासनाच्या संपर्कात असून पिडितेला न्याय मिळेल या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.