भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : दोन गावठी कट्ट्यांसह पाडळसेतील तरुणाला बेड्या


Major Operation by Bhusawal Market Police : Youth from Padalse Arrested with Two Country-Made Pistols भुसावळ (2 मे 2026) : गावठी कट्टे व गुप्ती बाळगून असलेला तरुण शहरात संशयास्पदरित्या वावरत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर डीबी पथकाने संशयीताच्या मुसक्या बांधल्या. भूषण शांताराम कोळी (19, रा.पाडळसा, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले आणि एक धारदार गुप्ती जप्त करण्यात आली. आरोपीने गावठी कट्टे कोणत्या उद्देशाने शहरात आणली ? याचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलिसांना आलिशान वॉटर पार्कच्या मागील मोकळ्या जागेत एका तरुणाकडे शस्त्र असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी रात्री 8.20 वाजता सापळा रचला. यावेळी संशयीत पोलिसांना पाहताच पळण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यास यंत्रणेने ताब्यात घेतले. अंग झडतीत त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे तसेच एक हजार रुपये किंमतीची गुप्ती व 20 हजार रुपये किंमतीचा आयफोन जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत.

पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध
अटकेतील आरोपीने शस्त्र कधी व कुणाकडून खरेदी केले? शस्त्रांसह तो शहरात का आला? तसेच त्याची यापूर्वीची पार्श्वभूमी व शस्त्रांचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी करण्यात येणार होता याबाबतची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. शहरात सातत्याने तरुणांकडे गावठी कट्टे आढळत असल्याने समाजमन चिंतीत झाले आहे. गावठी कट्ट्यांचे थेट उमर्टी कनेक्शन असल्याची माहिती आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !