यावल शहरात स्लॅब कोसळल्याने बालकाचा मृत्यू
यावल (4 मे 2026) : यावल शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील रहिवाशी एका दहा वर्षीय बालकाच्या अंगावर क्रिकेट खेळत असतांना अचानक स्लॅब कोसळला आणि या त्याखाली तो दाबला जाऊन गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला खाजगी रुग्णालय भुसावळ येथे उपचाराकरीता दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रणवीर जगदीश गायकवाड (10) असे मृत बालकाचे नाव आहे
क्रिकेट खेळताना कोसळला स्लॅब
रणवीर हा बालक रविवारी सायंकाळी मुलांसोबत आपल्या घराच्या बाहेर क्रिकेट खेळत असताना अचानक जुन्या जीर्ण झालेल्या घरासमोरील पोर्चचा स्लॅब त्याच्या अंगावर कोसळला आणि तो गंभीर जखमी झाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने उपचारार्थ भुसावळातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान या बालकाचा मृत्यू झाला. तेथून त्याचा मृतदेह रात्रीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

डॉ.गौरव भोईटे यांची शवविच्छेदन करीत मृतदेह नातेवाईकांना सोपवला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.