महिलांसह मुलींची छेडछाड थांबणार ! जळगावात ‘दामिनी पथक’ पुन्हा सक्रिय

टवाळखोरांवर होणार कारवाई : स्वतंत्र वाहनामुळे वेळीच घटनास्थळ गाठता येणार


Harassment of Women and Girls to Stop! ‘Damini Squad’ Active Again in Jalgaon जळगाव (6 मे 2026) : महिलांसह विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘दामिनी पथक’ सक्रिय नव्हते मात्र जिल्ह्यात नव्यानेच रूजू झालेले अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी हे पथक बुधवार, 6 मे पासून सक्रिय केले आहे. महिलांवरील वाढते अत्याचार आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड रोखण्यासाठी हे पथक आता शहराच्या कानाकोपर्‍यात फिरणार असल्याने महिलांसह मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे.

पथकाला मिळाले स्वतंत्र वाहन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वतः या उपक्रमात पुढाकार घेऊन नवनियुक्त दामिनी पथकातील महिला पोलीस अंमलदारांशी थेट संवाद साधला. या बैठकीत त्यांनी पथकाच्या कामाचे स्वरूप, प्रशासनाच्या अपेक्षा आणि जबाबदार्‍यांबाबत सविस्तर सूचना केल्या. पथकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि गस्त अधिक वेगवान करण्यासाठी प्रशासनाकडून एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने या पथकाच्या स्वाधीन करण्यात आली. या वाहनांमुळे आता अरुंद गल्ल्यांपासून ते मुख्य बाजारपेठेपर्यंत पथकाला सहज पोहोचता येईल.



गुन्हेगारांवर राहणार वचक
दामिनी पथकाचे मुख्य उद्दिष्ट महिला आणि विद्यार्थिनींना संरक्षण देणे, तसेच घरगुती हिंसाचार आणि छेडछाडीच्या घटनांवर कडक नियंत्रण मिळवणे हे आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके आणि बाजारपेठा अशा गजबजलेल्या ठिकाणी हे पथक सातत्याने गस्त घालणार आहे. केवळ गुन्हेगारांवर वचक बसवणे एवढेच मर्यादित कार्य न ठेवता, महिलांमध्ये पोलिसांविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि त्यांना अन्यायाविरुद्ध तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे या पथकाचे प्रमुख ध्येय असणार आहे.

साध्या वेशात फिरणार पोलीस
दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून हे पथक शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना ‘गुड टच-बॅड टच’ याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी मुलींना सायबर सुरक्षेची माहिती दिली जाणार आहे. महिला हेल्पलाईन क्रमांक 1091 वर येणार्‍या तक्रारींना हे पथक प्राधान्याने प्रतिसाद देणार असून, अनेक ठिकाणी अवघ्या 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासोबतच टवाळखोरांना लगाम घालण्यासाठी हे पथक साध्या वेशातही तैनात असू शकते.

महिलांना लाभेल सुरक्षिततेचे कवच
गुन्हेगारी नियंत्रणासोबतच पीडित महिलांना कायदेशीर सल्ला, वैद्यकीय मदत आणि मानसिक आधार देण्याचे कामही दामिनी पथकाद्वारे केले जाणार आहे. समुपदेशनाच्या माध्यमातून पीडितांचा आत्मविश्वास वाढवणे आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, यावर पथकाचा भर असेल. पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक निर्णयामुळे जळगाव शहरात महिलांच्या सुरक्षिततेचे कवच पुन्हा भक्कम झाले असून, टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यातील सर्वच ठाण्यांना निर्देश देण्याची अपेक्षा
जळगाव जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक असलेतरी ते अपवादात्मक परिस्थितीत कार्य करते. जिल्ह्यातील अनेक खेड्या-पाड्यातून मुली शिक्षणासाठी शहरात येतात त्यामुळे बसस्थानक, शाळा, महाविद्यालय तसेच खाजगी ट्यूशन परिसरात या पथकाने गस्त घातल्यास टवाळखोरांना चाप बसेल व मुली भयमुक्त वातावरणात शिक्षण घेतील, असा आशावाद पालकांमधून व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !