व्हॉटसअॅपवर एपीके फाईल आल्यास सावधान ! तर तुमचेही खाते होईल रिकामे ; मुक्ताईनगरात एकाला 91 हजारांचा गंडा
Beware if you receive an APK file on WhatsApp! Your bank account could be drained; a Muktainagar resident scammed out of ₹91,000. मुक्ताईनगर (10 मे 2026) : सोशल मिडीयावरल व्हॉटसअॅपवर अनेकदा एपीके फाईल दिसते व उत्सुकतेपोटी ही फाईल अनेकजण डाऊनलोड करतात मात्र तुम्ही असे करीत असाल तर तुमचे खाते रिकामे होवू शकते. मुक्ताईनगरात लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठविण्यात आलेली बनावट एपीके फाईल उघडताच एका नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल 91 हजार रुपये परस्पर काढण्यात आले.
काय घडले नागरिकासोबत ?
मुक्ताईनगरातील वासुदेव भंगाळे यांना 7 मे रोजी त्यांच्या मित्राच्या व्हॉट्सअॅप नंबरवरून लग्नपत्रिकेचा मेसेज प्राप्त झाला. संदेश परिचित व्यक्तीकडून आल्याने त्यांनी कोणताही संशय न घेता त्या मेसेजसोबत पाठवलेली एपीके फाईल मोबाईलमध्ये उघडली मात्र फाईल ओपन करताच सायबर हॅकर्सनी त्यांच्या मोबाईलमधील बँकिंग माहितीचा ताबा घेत खात्यातून 91 हजार रुपये लंपास केले.


या प्रकारानंतर धक्कादायक बाब म्हणजे संबंधित मित्राचा व्2हॉट्सअॅप अकाउंटही हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगार आता ओळखीच्या व्यक्तींची खाती हॅक करून त्याच्याच नावाने बनावट मेसेज पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
खात्यातून रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच वासुदेव भंगाळे यांनी तत्काळ सायबर क्राईम विभागाकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही घटना अत्याधुनिक सायबर फसवणूक पद्धतीने घडविण्यात आल्याचे समोर आले आहे.
नागरिकांना सायबर पोलिसांकडून आवाहन
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा एपीके फाईल्सद्वारे मोबाईलमध्ये मालवेअर टाकून बँकिंग माहिती, ओटीपी तसेच वैयक्तिक डेटा सहज हॅक केला जातो त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद फाईल्स, लिंक किंवा मेसेज उघडू नयेत. ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला तरी त्याची खातरजमा केल्याशिवाय कोणतीही फाईल डाउनलोड करू नये, असे आवाहनही सायबर पोलिसांनी केले आहे.
