यावल शहरात एकावर चाकू हल्ला : उसनवारीच्या पैशाचा वाद विकोपाला
Knife Attack on Individual in Yawal City : Dispute Over Borrowed Money Escalates यावल (17 मे 2026) : यावल शहरातील सातोद रस्त्यावर शासकीय गोदामाच्या मागे हडकाई नदीच्या पात्रात उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादानंतर 43 वर्षीय इसमाला दोघांनी मारहाण केली तसेच चाकूने वार करीत दुखापत केली. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भालोद, ता.यावल येथील दोन जणांविरोधात गुन्हरा दाखल करण्यात आला. जखमीला उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
यावल शहरातील सिद्धार्थ नगर भागातील रहिवाशी विनोद पंढरीनाथ मेढे (43) याने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी तो यावल शहरात असताना बाळू रमेश तायडे व मनोहर भालेराव (दोघे रा.भालोद, ता.यावल) आले. उसनवारीच्या पैशावरून त्यांनी वाद घातला आणि त्याला त्यांच्या दुचाकीवर बसून सातोद रोडवरील शासकीय गोदामाच्या मागील हडकाई नदीजवळ नेले आणि तेथे त्याला शिवीगाळ करून मारहाण केली व बाळू यांनी चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याला जबर दुखापत करीत दोघे पसार झाले.
जखमी अवस्थेत विनोद मेढे याने यावल पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केली. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी करीत आहे.










