धुळे सायबर पोलिसांची मोठी कारवाई : ‘व्हीआयपी ट्रेडिंग ग्रुप’च्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक करणारी वसईतील टोळी जाळ्यात
टोळीने घातला तीन कोटी 14 लाखांचा गंडा : तक्रारदाराला एक कोटी 19 लाख रुपये परत मिळवण्यात यश
गणेश वाघ
धुळे (18 मे2026) : ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा धुळे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नायगाव (वसई) येथे बनावट कॉल सेंटर उभारून ही टोळी देशभरातील नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी तातडीने कारवाई करत फसवणुकीतील तब्बल एक कोटी 19 लाख रुपये परत मिळवण्यात यश मिळवले आहे.
काय आहे प्रकरण ?
सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, धुळ्यातील इंजिनिअर व फिर्यादी हर्षद नारायण देशपांडे यांना व्हॉट्सअॅपवरून शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली संपर्क साधण्यात आला होता. आरोपींनी 848 FYERS HNI VIP Growth Hub नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना जोडले. त्यानंतर FYERS INDI- (HNI)नावाचे अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले.
सुरुवातीला काही व्यवहारांमध्ये चांगला परतावा देऊन आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएस, एनईएफटी व युपीआयद्वारे तीन कोटी 14 लाख 99 हजार 891 रुपये स्वीकारले मात्र परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे, धुळे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल तपासाद्वारे पोलिसांनी नायगाव (वसई) येथील बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला. येथून बनावट सिमकार्डच्या माध्यमातून नागरिकांना फोन करून शेअर्स आणि आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले जात असल्याचे समोर आले.
टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी या टोळीतील साबीर मोहम्मद खान (50, वसई, पश्चिम)
सनत संजीब दास (52, वसई, पश्चिम), राहुलकुमार शुक्ला ऊर्फ कैलाश राकेशकुमार (24, मिरारोड पूर्व, जि.ठाणे), आमिर करमशेर खान (34, जमशेदपूर, झारखंड) यांना अटक केली तर अभिषेक नारकर ऊर्फ गोपाल (अंधेरी पूर्व, मुंबई), मोहम्मद रशीद फकीर मोहम्मद बलोच ऊर्फ लक्की (उडवी, कर्नाक) हे आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
एक कोटी रुपये परत मिळवण्यात यश
या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित बँक खाती तातडीने गोठवून फसवणुकीतील एक कोटी 19 लाख रुपये परत मिळवले. सायबर गुन्हेगारांकडून शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली होणार्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन धुळे पोलीस प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा लिंकवर विश्वास ठेवू नये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवणार्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधावा









