नाशिक एसीबीची मोठी कारवाई : येवला वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांसह आठ संशयीत जाळ्यात

सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी 11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई


गणेश वाघ
Major Operation by Nashik ACB: Eight Suspects—Including Officers and Staff—from Yeola Forest Range Office Caught in the Net. भुसावळ (19 मे 2026) : येवला येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व खासगी इसमांनी सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई केली. या कारवाईत सहा लोकसेवक आणि दोन खासगी इसमांना एकूण 11 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवार, 19 रोजी रंगेहात पकडण्यात आले. एकाचवेळी आठ संशयीतांना अटक करण्यात आल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी दहेगाव पाटोदा (ता. येवला, जि. नाशिक) येथील गट क्रमांक 61 मधील 2 हेक्टर 49 आर क्षेत्रातील सागाची झाडे तोडून विक्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अंगणगाव येथे परवानगीसाठी अर्ज केला होता. ही परवानगी मिळवून देण्यासाठी संबंधित आरोपींनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती.




एसीबीने पडताळणी केल्यानंतर सापळा रचला. त्यामध्ये आरोपींनी स्वतःसाठी व इतरांसाठी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. आरोपींमध्ये वनपाल, वनरक्षक, कनिष्ठ लिपीक, कार्यालयीन वनरक्षक, अधिसंख्य वनमजूर तसेच खासगी डाटा ऑपरेटर आणि चालकाचा समावेश आहे.

या आरोपींना अटक
भाऊसाहेब पंढरीनाथ माळी (39) – वनपाल, राजापूर विभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला
पंकज राजेंद्र नागपुरे (35) – वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला
प्रविण बाळासाहेब भोसले (21) कनिष्ठ लिपिक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला
आकाश नामदेव कोळी (32) – कार्यालयीन वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला
विजय शिवाजी लोंढे (49) – अधिसंख्य वनमजूर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, येवला
रामनाथ लक्ष्मण भोरकडे (55) – अधिसंख्य वनमजूर, वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय येवला.
निखील सुनिल आरणे (29) – खासगी डाटा ऑपरेटर.
सुनिल भगवान भुरूक (33) – खासगी चालक, शासकीय वाहनावर कार्यरत.

असे होणार होते लाचेचे वाटप
एसीबीच्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक 1 भाऊसाहेब माळी यांच्यासाठी पाच हजार रुपये आरोपी पंकज नागपुरे यांनी स्वीकारले. तसेच पंकज नागपुरे यांनी स्वतःसाठी 2 हजार रुपये, प्रविण भोसले यांनी 1 हजार रुपये, आकाश कोळी यांनी 1 हजार रुपये, विजय लोंढे यांनी 1 हजार रुपये, निखील आरणे यांनी 1 हजार रुपये आणि चालक सुनिल भुरूक यांनी 500 रुपये स्वीकारले. आरोपी रामनाथ भोरकडे यांनी तक्रारदाराला लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.

यांनी केला सापळा यशस्वी
ही सापळा पोलीस निरीक्षक पूनम केदार, पोलीस निरीक्षक प्रतिभा आबुज, पोलीस हवालदार युवराज खांडवी, पोलीस नाईक किरण धुळे, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस हवालदार गणेश निंबाळकर, पोलीस हवालदार नितीन नेटारे आदींनी यशस्वी केला.

या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनिल दोरगे यांनी केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !