राज्यभरात इंधनाचा तुटवडा ; विरोधकांचा सरकारवर निशाणा : डबल इंजिन सरकारमधील तेलही संपले का?
मुंबई (20 मे 2026) :इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली असतानाच राज्यातही इंधन संकट निर्माण झाले आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वाद घडत असून सर्वदूर रांगा लागल्याचे चित्र आहे. इंधन टंचाईवरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत डबल इंजिन सरकारमधील तेलही संपले का? असा तिखट प्रश्न उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात सरकार नाही, फक्त जाहिरातींचा बाजार उरलाय – वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, जळगावमध्ये पेट्रोलसाठी पेट्रोल पंपावरील कर्मचार्यावर प्राणघातक हल्ला होतो, बुलढाण्यात हतबल माणूस 12 तास उन्हात होरपळतोय आणि अकोल्यात इंधनासाठी सामान्य माणूस जीव पणाला लावतोय! कहर म्हणजे नागपुरात बेपत्ता मुलीचा शोध घ्यायला निघालेल्या पोलिसांच्या गाडीत डिझेल नाही!



महाराष्ट्र कोलमडून पडलाय आणि ट्रिपल इंजिन पूर्णपणे ठप्प पडले आहे. हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही, तर भाजपाच्या विकसित भारत या ढोंगी दाव्याचे धिंडवडे आहेत! वर्षानुवर्षे ज्या डबल इंजिनची टिमकी वाजवली, त्यातील एकही इंजिन चालत नाहीये..
जनतेला सुरक्षा नाही, इंधन नाही,
निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्याच पैशातून उभारलेले जाहिरातींचे फलक मात्र निर्लज्जपणे चमकतायत! रस्त्यावरचा सामान्य माणूस थेंब-थेंब पेट्रोलसाठी आणि हक्काच्या जगण्यासाठी झगडतोय, आणि दिल्लीतले राजे मात्र अमृतकालचे खोटे गोडवे गाण्यात मग्न आहेत. आज महाराष्ट्रात सरकार नाही, तर फक्त जाहिरातींचा बाजार उरलाय! जनतेचा संताप आणि आक्रोशावर सत्ताधरी मौज करत आहे. आग लगे बस्ती मे, हम अपनी मस्ती मैं, असे ते म्हणालेत.
डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का?
जयंत पाटील म्हणाले, जळगावमध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणार्या एका कर्मचार्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं 12 तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही. चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? असा प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे.
उधारीत पेट्रोल – डिझेल देणे बंद
मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल पंप मालकांना 3-5 दिवस उधारित पेट्रोल-डिझेल द्यायचे. पण 21 मार्चनंतर कंपन्यांनी ही क्रेडिट पॉलिसी बंद करून अॅडव्हान्स पेमेंट सक्तीचे केले. त्यामुळे बहुतांश पंप मालक पेट्रोलच्या तुलनेत डिझेल कमी मागवत आहेत. याचाही फटका ट्रॅक्टर चालकांना बसत आहे.
नाशिक येथेही टंचाईचे सावट
नाशिक शहरात पेट्रोल व डिझेलचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णतः वेगळी आहे. शहरातील त्र्यंबकरोड, वडाळारोड, पंचवटी, सातपूर, सिडको आदी भागांतील अनेक पेट्रोलपंपांवर मंगळवारी डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसल्या. काही पेट्रोलपंपांवर ‘डिझेल उपलब्ध नाही’, अशा पाट्या लावण्यात आल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.






