जळगावात उष्माघाताने दोघांचा मृत्यू !


Two Die of Heatstroke in Jalgaon! जळगाव (26 मे 2026) : जिल्ह्यातील तापमान 44 अंशांपुढे गेल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात तीव्र उन्हाचा चटका सहन न झाल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

केशरलाल दौलत पाटील (57, रा.चिंचोली, ता.जळगाव) आणि प्रवीण दत्तू मिस्तरी (वय 36, मूळ रा.पुणे, सध्या राहणार जळगाव) अशी मृतांची नावे असून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

देवपिंप्रीत मजुराचा मृत्यू
पहिली दुर्दैवी घटना जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे समोर आली. चिंचोली येथील रहिवासी असलेले केशरलाल पाटील हे दुपारच्या रणरणत्या उन्हात सेंट्रिंगचे काम करत होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास उन्हाचा चटका सहन न झाल्याने अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि ते चक्कर येऊन खाली पडले. त्यांच्या सोबत काम करणार्‍या सहकार्‍यांनी तातडीने त्यांना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवले मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती; डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

भरचौकात तरुण निपचित पडला
दुसर्‍या एका घटनेत, जळगाव शहरातील गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या चित्रा चौकात प्रवीण मिस्तरी हा 36 वर्षांचा तरुण बेशुद्ध अवस्थेत स्थानिक लोकांना मिळून आला. नागरिकांनी तातडीने दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये तीव्र उन्हाचा फटका बसल्याने (उष्माघाताने) हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

अंतिम अहवालानंतरच कारण अधिकृत होईल: डॉ. गिरीश ठाकूर
या संपूर्ण प्रकरणावर बोलताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर यांनी सांगितले की, दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत. वरवर पाहता हा प्रकार उष्माघाताचा वाटत असला, तरी मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण काय होते, हे शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच अधिकृतपणे सांगता येईल.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !