जन्मत: हृदयाला छिद्र असलेल्या बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाचा आणखी एक वैद्यकीय यश
जळगाव (26 मे 2026) : रावेर तालुक्यातील आठ वर्षीय बालकावर जन्मत: हृदयाला छिद्र (व्हीएसडी) असतानाही यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देण्यात डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी मोठे यश संपादन केले आहे.
बालकाला श्वास घेण्यास त्रास
रावेर तालुक्यातील विदीत या आठ वर्षीय बालकाला काही दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच वारंवार कफाचा त्रास जाणवत होता. कुटुंबीयांनी स्थानिक स्तरावर उपचार केले, मात्र समाधानकारक फरक पडत नसल्याने त्यांनी पुढील तपासणीसाठी जळगाव येथील डॉ.उल्हास पाटील रूग्णालय येथे संपर्क साधला.रूग्णालयात बालकाची सखोल तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत बालकाच्या हृदयात जन्मत: छिद्र असल्याचे स्पष्ट झाले. ही स्थिती वेळेवर लक्षात न आल्यास भविष्यात गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निदान झाल्यानंतर तातडीने उपचाराचा निर्णय घेण्यात आला. रूग्णालयाच्या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या बालकाची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
या टीमने केली शस्त्रक्रिया
हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोगतज्ज्ञ डॉ. धवलकुमार खडके, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. झिशान सय्यद, डॉ. मनमिता रेड्डी यांच्या टीमने अत्यंत काळजीपूर्वक व्हीएसडी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर बालकाची प्रकृती स्थिर असून तो आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्याला लवकरच घरी सोडण्यात आले.
लवकर निदान केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही होता सुरक्षित
जन्मत: हृदयातील छिद्र ही समस्या अनेक बालकांमध्ये आढळते. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. पालकांनी मुलांमध्ये श्वास घेण्यास त्रास, वजन न वाढणे, वारंवार सर्दी-कफ होणे अशी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष न करता तातडीने तपासणी करून घ्यावी.तसेच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दर आठवड्याला बालकांच्या हृदयाची मोफत तपासणी केली जाते. या सुविधेचा लाभ ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनी घ्यावा. लवकर निदान केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही सुरक्षितपणे करता येतात, असे डॉ.वैभव पाटील म्हणाले.

