सेवा आणि भक्ती तरुणपणातच करा : संत निलेश महाराज


चोपडा (11 जून 2026) : शहरातील श्रीराम नगरात सुरू असलेल्या गो-भागवत कथेमध्ये पाचव्या दिवशी प्रवचन करताना संत निलेश महाराज यांनी तरुणांना सेवा, संस्कार आणि भक्तीचे महत्त्व पटवून दिले. दुसर्‍यांना उपदेश करण्यापूर्वी स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणावे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

जीवन क्षणभंगुर
महाराज म्हणाले की, जीवन क्षणभंगुर आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगले वागून जीवन सार्थकी लावावे. तरुणपणात परिश्रम करून आर्थिक प्रगती साधावी, पण त्याचबरोबर भक्ती आणि सत्कर्मेही करावीत. तरुणपण वाया घालवू नये, कारण वृद्धापकाळात अनेक गोष्टी करणे शक्य होत नाही. गोमातेचे महत्त्व सांगताना त्यांनी गोमातेचे दूध, तूप, ताक आणि लोणी यांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन केले. तसेच गोबर व गोमूत्राचा औषधी उपयोग असल्याचे सांगून गोमाता ही चालते-फिरते मंदिर तसेच दवाखाना असल्याचे प्रतिपादन केले.

समाजात चांगल्या सवयी जोपासाव्यात, दुसर्‍यांच्या भल्याचा विचार करावा आणि कोणाचेही वाईट करू नये, असा संदेश देताना त्यांनी मत्सर, द्वेष आणि जळाऊ वृत्तीपासून दूर राहण्याचे आवाहन केले. हम सुधरेंगे, युग बदलेगा या विचारातून प्रत्येकाने स्वतःचे चारित्र्य जपावे, असेही त्यांनी सांगितले.

गो-भागवत कथेदरम्यान महाराजांनी वामन भगवान, राजा रघु आणि राजा दिलीप यांच्या कथा सांगितल्या. तसेच अप्रतिम भजनांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी के.डी.चौधरी यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भाविकांनी भजनांवर नृत्य करून उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. के. डी. चौधरी, त्यांचे सुपुत्र देवकांत चौधरी, सूर्यकांत चौधरी तसेच सौ. धनश्री चौधरी आणि सौ. प्रिया चौधरी हे गोसेवा व संतसेवेत सक्रिय योगदान देत असल्याचे गौरवोद्गार महाराजांनी काढले. त्यांच्या कार्याचा सन्मान करून संपूर्ण परिवाराला विशेष मंत्रोच्चारांद्वारे आशीर्वाद देण्यात आले.

राजेंद्र गणपत चौधरी, लखन तेली, चंद्रकला तेली, मोरे अप्पा, ज्ञानेश्वर पाटील, सौ. वर्षा पाटील, पांडुरंग चौधरी आदींनी आरतीचा लाभ घेतला. के. डी. चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर महाराजांचे पुष्पहार घालून स्वागत राजेंद्र गणपत चौधरी यांनी केले.

गो-भागवत कथा श्रवणाचा लाभ अधिकाधिक भाविकांनी घ्यावा, असे आवाहन देवकांत चौधरी, लखन तेली, सौ. धनश्री चौधरी, सूर्यकांत चौधरी व सौ. प्रिया चौधरी यांनी केले.

दरम्यान, शुक्रवार, 12 जून रोजी सकाळी 10 वाजता कथेला विश्रांती मिळणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष टी. एम. चौधरी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !