पाचोर्यात बंदुकीच्या धाकावर भरदिवसा दरोडा : त्रिकूट पोलिसांच्या जाळ्यात
सोन्याच्या चिपा घरात असल्याच्या माहितीनंतर आरोपीने रचला डाव
पाचोरा (16 जून 2026) : पाचोरा शहरातील एका कुटूंबाकडे कुरीयर पार्सल आल्याच्या निमित्ताने तीन भामट्यांनी प्रवेश करीत बंदुकीच्या धाकावर कुटूंबाला ओलीस ठेवत घरातील सात हजार सातशे रुपयांची रोकड लुटली होती. पाचोरा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना तक्रारदार महिलेच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लुटीचा डाव रचला मात्र आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
काय आहे प्रकरण ?
कुसूम एकनाथ मोकळे (42, सातगाव डोंगरी, ह.मु.लक्ष्मी आंगण कॉलनी, पाचोरा) यांच्या घरात 12 रोजी दुपारी 3.15 वाजता संशयीत आरोपींनी अॅमेझॉन कंपनीचे पार्सल आल्याचे सांगत प्रवेश केला. एका आरोपीने तक्रारदार महिलेसह त्यांच्या दोन मुलींना व मुलाला खाटेवर बसवत सोन्याच्या चिपा काढून द्या अन्यथा तुमचे काही खरे नाही म्हणत सोबतच्या पिस्टलने धमकावले होते व कपाटातील सात हजारांची रोकड तसेच मुलाच्या गल्ल्यातील सातशे रुपयांची रोकड लांबवली होती.
तीन आरोपींना अटक : नकली बंदूकही जप्त
पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपी चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर (21, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याने गुन्ह्यात मामा गोकुळ महादू वाघ (पाटील, 37, सातगावडोंगरी, ता.पाचोरा) व योगेश परशराम शिंदे (31, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक) यांचाही सहभाग असल्याची कबुली दिल्यानंतर दोघाही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी नकली पिस्टलाचा वापर केल्याने तेदेखील पोलिसांनी जप्त केले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, एएसआय विलास पाटील, कॉन्स्टेबल योगेश पाटील, हरीष परदेशी, गणेश कुंवर, श्रीराम शिंपी, नितीन भालेराव आदींच्या पथकाने केली.




