भुसावळ-फैजपूर मार्ग आजपासून महिनाभर बंद ; वाहनधारकांची गैरसोय
भुसावळ-सावदा प्रवास सहा रुपयांनी महागला
भुसावळ (17 जून 2026) : रस्ते कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने 17 जून ते 16 जुलै या कालावधीत भुसावळ – फैजपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहनधारकांची आता चांगलीच गैरसोय होणार आहे. भुसावळ-फैजपूर दरम्यानची थेट एसटी बससेवा तब्बल महिनाभर बंद राहणार असून भुसावळातून फैजपूरमार्गे सावदा, रावेर आणि बर्हाणपूरकडे जाणार्या बसेस आता फैजपूरऐवजी अकलूद फाटा-रिधूर-थोरगव्हाण-सावदा अशा धावतील. या मार्ग बदलल्यामुळे भुसावळ-सावदा बसप्रवास सहा रुपयांनी महागला आहे. आता प्रवाशांना 47 ऐवजी 53 रुपये भाडे मोजावे लागेल.
रस्त्याचे काम वेगात
भुसावळ ते फैजपूरदरम्यान पाडळसे, बामणोद, आमोदा आणि फैजपूर या मार्गावरील रस्ता रुंदीकरण, क्राँक्रीटीकरण सध्या वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी काम अपूर्ण असल्याने ते वेगाने पूर्ण करण्यासाठी पोलिस प्रशासनाने एक महिन्यासाठी हा मार्ग बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग
भुसावळातून फैजपूरकडे जाणार्या कार, जीप आणि इतर हलक्या वाहनांसाठी अंजाळे – चिखली – भालोद – हिंगोणा मार्ग निश्चित केला आहे. या मार्गाने वाहने बर्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला जोडून पुढे फैजपूरकडे जाऊ शकतील त्यामुळे या ग्रामीण मार्गांवर वाहनांची वर्दळ वाढेल. भुसावळ – फैजपूर मार्गे सावदा या प्रवासासाठी आधी 47 रुपये तिकीट होते. आता थोरगव्हाण मार्गे 53 रुपये तिकिट लागेल. म्हणजेच प्रत्येक प्रवाशाच्या खिशावर सहा रुपयांचा अतिरिक्त भार पडेल. रावेर आणि बर्हाणपूरच्या तिकीट दरात मात्र बदल केलेला नाही. रावेरसाठी 91 आणि बर्हाणपूरसाठी 129 रुपये तिकीट ‘जैसे थे’ आहे.




