मध्य रेल्वेतून 52 कर्मचारी सेवानिवृत्त : रेल्वेने केला सहृदय सन्मान
25 कोटींची सेवानिवृत्ती देयके कर्मचार्यांच्या खात्यात तत्काळ जमा
52 Central Railway employees retire: Railway accords them a heartfelt felicitation भुसावळ (1 जुलै 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मंगळवार, 30 जून 2026 रोजी 52 कर्मचारी विविध पदांवरून सेवानिवृत्त झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील कृष्णचंद्र सभागृहात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांना सहृदय सन्मान करीत निरोप देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यरत रेल्वे कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावली.
25 कोटींची रक्कम थेट बँक खात्यात जमा
प्रसंगी एकूण 52 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यापैकी 43 कर्मचारी जुन्या निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत तर नऊ कर्मचारी नवीन निवृत्तीवेतन योजनेंतर्गत असल्याचे रेल्वेने कळवले आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध सेवानिवृत्ती लाभांअंतर्गत सुमारे 25 कोटींची रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली.


यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल होते. प्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी दिलीप आर.खरात, रेल्वे विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
कर्मचारी हा भारतीय रेल्वेची संपत्ती
विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल म्हणाले की, रेल्वे कर्मचारी ही भारतीय रेल्वेची सर्वात मौल्यवान संपत्ती आहे. कर्मचार्यांनी आपल्या समर्पण, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर भारतीय रेल्वेच्या प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना निरोगी, सुखी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या.
अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) प्रवीण कुमार पाठक यांनी सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या दीर्घ, समर्पित व उत्कृष्ट सेवाकाळाचे कौतुक करत त्यांच्या योगदानाला अविस्मरणीय असल्याचे सांगितले.
समारंभादरम्यान सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डरच्या प्रती प्रदान करण्यात आल्या. संपूर्ण कार्यक्रमात सन्मान, आत्मीयता आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण अनुभवास आले.
